सोलापूर : ऐन पावसाळ्यात लिंबाचे दर वाढले असून एक किलो लिंबूचे दर शंभरी पार गेले आहेत. सद्यःस्थितीत पावसाळा सुरू असूनही लिंबांना मागणी वाढली आहे. मात्र, यंदा दरवर्षीप्रमाणे होणारी आवक यंदा कमी आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या लिंबाला होलसेलमध्ये ७५ रुपये किलो दर मिळत आहे, तर बाजारात ८० ते १२० किलोप्रमाणे विक्री होत असल्याचे लिंबू व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरवर्षी साधारणपणे जून ते ऑगस्ट या कालावधीत लिंबाला कमी मागणी असते. पाऊस जास्त असल्याने फळावर त्याचा परिणाम झाल्याने बाजारात आवक कमी आहे.
बाजार समितीत आलेल्या मालाला दिल्ली, मुंबई अशा मोठ्या शहरातून मोठी मागणी असल्याने अधिक माल बाहेर जात असून शहरातील बाजारात पुरवठा कमी होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने लिंबाचे पीक खराब झाल्याने ही भाववाढ झाली आहे.
सध्या बाजारात खराब लिंबाचा माल मोठ्या प्रमाणात येत आहे आणि चांगला माल हा कमी प्रमाणात येत असल्यामुळे लिंबाचे दर वाढले आहेत. एका लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. एका किलोत आकारानुसार साधारण वीस ते तीस लिंबू येतात.
दहा टन होणारी आवक दोन टनावर
मार्केट यार्डातील बाजारात करमाळा, सांगोला, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर भागांतून लिंबाची आवक होत आहे. कायम दहा ते बारा टन होणारी आवक कमी होऊन ती आवक केवळ दोन टनावर आली आहे.
पहिल्यांदाच उच्चांकी भाव
उन्हाळ्यामध्ये लिंबूचा सिझन असताना प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत दर मिळाले होते. मात्र, पावसाळ्यात शहरातील विविध बाजारात १२० पर्यंत भाव पोहोचले आहेत. विशेष म्हणजे गेल्या दहा-पंधरा वर्षात पहिल्यांदाच लिंबाला उच्चांकी दर मिळाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
यंदा पावसाळ्यातही लिंबाला चांगली मागणी आहे. गेली चार महिने लिंबाचे दर वधारलेले आहेत. पुढील दोन-तीन महिने दर कायम राहण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये नवीन मालाची आवक झाल्यानंतर दर कमी होतील. - अल्ताफ लिंबूवाले, लिंबू व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर