Join us

आज उद्या करीत जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरीही सोयाबीन घरातच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 4:33 PM

सोयाबीनची दर कोंडी कायम; शेतकरी अडचणीत

नगदी पीक असलेल्या सोयाबीनची दरकोंडी जवळपास पाच महिन्यांपासून कायम आहे. नैसर्गिक संकटांमुळे उत्पादनात झालेली घट आणि बाजारात मिळणारा पडता भाव यामुळे फटका बसला असून, सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

मागील काही वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा इतर पिकांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात होत आहे. पेरणीलायक क्षेत्राच्या निम्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनचे पीक असते. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनकडे पाहतात. परंतु, यंदा पावसाचा लहरीपणा, सोयाबीन ऐन भरात असताना येलो मोझकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली.

अशा परिस्थितीत बाजारात भाव तरी समाधानकारक मिळेल, अशी आशा होती. मात्र, पाच हजाराचा पल्लाही सोयाबीन गाठू शकले नाही. प्रारंभी ४ ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत होता. परंतु, भावात वाढ होईल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले. आज उद्या करीत जवळपास पाच महिन्यांचा कालावधी उलटला तरी भाव मात्र वाढायला तयार नाहीत. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांची निराशा झाली.

अजूनही सोयाबीनचे भाव वाढण्याची शाश्वती नसल्याने शेतकरी आता मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करीत आहेत. सध्या ४ हजार ३०० ते ४ हजार ५०० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. घटलेले उत्पादन, लागवड खर्च पाहता मिळणारा भाव समाधानकारक नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतकर्‍यांनो लेकीच्या नावाने पोस्टाच्या या योजनेत खाते उघडा होईल मोठा फायदा

दरवाढ होण्याऐवजी घसरण...

उत्पादनात झालेली घट लक्षात घेता यंदा सोयाबीनला किमान सहा हजार रुपये क्चिटलचा भाव मिळेल, अशी आशा होती. मात्र, सोयाबीनने ५ हजाराचा पल्लाही गाठला नाही. दरवाढ होण्याऐवजी घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा असून, सोयाबीनचे पीक परवडले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. व्यापारी अजूनही भाववाढीची शाश्वती देत नसल्याचे चित्र आहे.

दोन वर्षांपासून समाधानकारक दराची प्रतीक्षा...

हिंगोली जिल्ह्यात इतर पिकांच्या तुलनेत सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होतो. परंतु, मागील दोन वर्षांपासून दर मात्र समाधानकारक मिळत नसल्याचे चित्र आहेत. त्यामुळे लागवडही वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा घटण्याची  शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :सोयाबीनबाजारशेतीशेतकरीहिंगोली