देशात कांद्याचे उत्पादन कमी असल्याचे सांगून केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ७ डिसेंबर २०२३ राेजी निर्यातबंदी लादली. जानेवारी ते मार्च २०२४ या तीन महिन्यांतील देशातील कांद्याची एकूण मागणी सरासरी ५४ लाख मेट्रिक टन असून, सरासरी उत्पादन ७० लाख मेट्रिक टन आहे. परिणामी, देशात किमान १६ लाख मेट्रिक टन कांदा अतिरिक्त असताना सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
देशात प्रति व्यक्ती, प्रति महिना १.२५ किलाे कांद्याची मागणी व वापर याप्रमाणे जानेवारी ते मार्च या काळात देशाला सरासरी ५४ लाख मेट्रिक टन कांद्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय सांगते. या काळात महाराष्ट्रातील ४८, गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशातील १२, पश्चिम बंगालचा (सुखसागर कांदा) १० आणि कर्नाटकातील २ असा एकूण ७० लाख टन खरीप कांदा बाजारात येत आहे.
कृषी विभागाच्या मते, हेक्टरी १५ तर शेतकऱ्यांच्या मते, हेक्टरी २० टन कांद्याचे उत्पादन हाेते. कृषी विभागाची आकडेवारी विचारात घेता जानेवारी ते डिसेंबर २०२४ या काळात कांद्याची मागणी २१६ लाख मेट्रिक टन असून, देशभरात किमान २५५ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन हाेणे अपेक्षित आहे. लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादनातही वाढ हाेणार आहे. कांद्याचे उत्पादन अतिरिक्त ठरत असताना कांद्यावर निर्यातबंदी का लादली, असा प्रश्न कांदा उत्पादकांसह बाजारतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
१.२४ लाख हेक्टरने लागवड क्षेत्र वाढलेदेशभरात सन २०२२-२३ च्या रब्बी हंगामात ६.३२ लाख हेक्टरमध्ये कांदा लागवड करण्यात आली हाेती. यावर्षी (सन २०२३-२४) यात १.२४ लाख हेक्टरने वाढ झाली असून, हे क्षेत्र ७.५६ लाख हेक्टरवर पाेहाेचले आहे. या क्षेत्रात आणखी वाढ हाेण्याची शक्यता आहे. मध्यंतरी कांद्याला चांगला दर मिळाल्याने लागवड क्षेत्रात वाढ झाली असून, यात दक्षिण भारत आघाडीवर आहे.
सन २०२२-२३ मध्ये विक्रमी निर्यातभारताने सन २०२२-२३ मध्ये २५.२५ लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केली हाेती. यातून देशाला ५६१ मिलियन डाॅलर मिळाले हाेते. ही निर्यात प्रति माह २.१० तर पहिल्या तीन महिन्यांतील ६.३० लाख मेट्रिक टन एवढी हाेती. ही विक्रमी निर्यात असल्याची माहिती कांदा निर्यातदारांनी दिली.
अतिरिक्त कांद्याचे काय करणार?जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत किमान ७० लाख मेट्रिक टन कांदा बाजारात येणार असून, मागणी ५४ लाख मेट्रिक टन असल्याने १६ लाख मेट्रिक टन कांदा शिल्लक राहणार आहे. वर्षभरात किमान ३९ ते ४४ लाख मेट्रिक टन कांदा अतिरिक्त ठरणार असल्याने या कांद्याचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.