Join us

पपईला कोणी विचारेणा, थेट चार अन् पाच रुपयांवर भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 2:25 PM

पपई आज चार रुपये प्रति किलोवर आल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे.

जळगाव जिल्ह्यासह राज्यातील पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून पपई कवडीमोल भावात विक्री केली जात आहे. काही दिवसांपूर्वी किलोला 14 रुपये मिळालेली पपई आज चार रुपये प्रति किलोवर आल्याने शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर थेट पपईच्या बागेवरच रोटारोव्हर फिरवला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

जळगाव, धुळेंसह नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईची लागवड करण्यात येते. मागील वर्षी पपईची कमी क्षेत्रात लागवड करण्यात आल्याने चांगला भाव मिळत होता. मात्र यंदा अधिकच्या क्षेत्रावर पपईची लागवड करण्यात आल्याने भावात घसरण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शिवाय अवकाळी पाऊस आणि अनेक रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने देखील भावात घसरण झाल्याचे दिसून आले. पिवळी झालेली पपई वाया जात असल्याने तोडगा म्हणून काही शेतकऱ्यांनी काठियावाडी पशुपालकांना पपई मातीमोल दरात देऊन टाकली आहे. ही पपई पशुपालक गुराढोरांना चारा म्हणून खाऊ घालत आहेत.

शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरात लागवड केलेल्या पपईला खराब हवामानाचा फटका बसला आहे. परिसरात ठिकठिकाणी पपई झाडावरच पिवळी होऊन गळून पडत आहे. यातून पपईचा भाव 14 रुपयांवरून प्रतिकिलो थेट 4 रुपयांवर आला आहे. यामुळे शेतकरी हैराण झाले असून यंदाचा हंगामा वाया गेल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत. म्हसावद, पिंप्री, ब्राम्हणपुरी, कुढावद या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने पपई लागवड केलेली आहे. महागडी रोपे, औषधी, खत वापरून मोठ्या आशेने पपई पिकाची लागवड केली. पपईचे पीक चांगले होऊन झाडाला फळधारणाही चांगल्या प्रमाणावर झाली. मात्र गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात शेतात दीर्घकाळ पाणी साचून होते. यातून झाडांवर मर आल्याने मोठ्या प्रमाणात झाडावरची पपई पिवळी होऊन गळू लागल्याने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हिरावला गेला आहे. 

पपईचा आजचा बाजारभाव 

दरम्यान पपईला काही दिवसांपूर्वी 14रुपये किलो इतका भाव मिळत होता. मात्र आता थेट कवडीमोल भावात विकली जात आहे. एकीकडे यंदा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने पपई बागा उभ्या केल्या आहे. मात्र वेळेवर पाऊस झाला नाही, त्यानंतर झालेला अवकाळी पाऊस, नंतर झालेला रोगांचा प्रादुर्भाव यामुळे बाजारभाव पुरते घसरले. आजच्या घडीला राहता बाजार समितीत पपईला प्रतिक्विंटल कमीत कमी 700 रुपये, जास्तीत जास्त 1500, तर सरासरी 1100 रुपये इतका भाव मिळाला. तर कालचा बाजारभाव बघता जळगाव बाजार समितीत प्रति क्विंटलला कमीत कमीत 1000 रुपये, जास्तीत जास्त 1500, तर सरासरी 1200 रुपये भाव मिळाला. त्यानुसार साधारण सहा ते सात रुपये प्रति किलो दर मिळाला. मात्र आज पुन्हा भावात घसरण होऊन चार रुपये किलोवर येऊन ठेपला आहे. 

टॅग्स :शेतीजळगावमार्केट यार्ड