Join us

गुलाबी कांद्याचे भावात घसरण; नगरला कसा सुरु आहे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 14:56 IST

श्रीगोंदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी दहा हजार गोण्या गुलाबी कांद्याची आवक झाली. मात्र, कांद्याचे भाव कोसळले आहेत. ८ ते ९ रुपये किलो याप्रमाणे भाव निघाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : श्रीगोंदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी दहा हजार गोण्या गुलाबी कांद्याची आवक झाली. मात्र, कांद्याचे भाव कोसळले आहेत. ८ ते ९ रुपये किलो याप्रमाणे भाव निघाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

श्रीगोंदा तालुक्याची कांद्याचे आगार, अशी ओळख आहे. येथील शेतकरी श्रीगोंदा, पारगाव फाट्यावरील चैतन्य बाजाराप्रमाणे राज्यासह देशातील इतर बाजारपेठेतही कांदा विकतात. गेल्यावर्षी कांद्याला चांगले भाव मिळाले होते. मात्र, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.

खराब हवामानामुळे गुलाबी कांद्याचे एकरी उत्पादन पन्नास टक्क्यांनी घटले आहे. अशा परिस्थितीत भाव कमी झाले. एकरी उत्पादन खर्च ५५ ते ६० हजार इतका आहे. भाव कोसळल्याने एकरी ४० ते ४२ हजारांची पट्टी हातात पडू लागली आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. बँकेचे कर्ज कसे फेडायचे आणि चूल कशी पेटवायची? मुलांचे शिक्षण कसे करायचे? असे प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत. श्रीगोंदा बाजार समितीत कांद्याचे आवक वाढली आहे. त्यामुळे बाजार समितीच सेस वाढणार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही, ही वेदनादायी बाब आहे.

कांद्याला एकरी खर्च असा. (रु.)मशागत  ५,०००रोप  १०,००० लागवड  १०,००० खते  ७,०००औषधे  ५,०००काढणी  १०,००० वाहतूक व व बारदाना  ५,०००

यंदा दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. कांद्यातून चार पैसे मिळतील अशी आशा होती. एका बाजूला उत्पादन घटले आणि दुसऱ्या बाजूला भाव पडले. केंद्र सरकारने शहरी भागाचा विचारही करावा. लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडावी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मारू नये, एवढीच अपेक्षा आहे. - शामराव साबळे, कांदा उत्पादक शेतकरी, भानगाव, ता. श्रीगोंदा

देशात रामराज्य आणल्याचे बोलले जाते. मात्र, कांदा व इतर शेतमालाचे भाव घसरत आहेत. शेतकऱ्यांबाबत दुजाभाव केला जात आहे. आता जगावे की मरावे हेच समजत नाही. - काकासाहेब शिर्के, कांदा उत्पादक शेतकरी, बाबुर्डी, ता. श्रीगोंदा

माजी आमदार राहुल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा बाजार समितीने शेतकरी व व्यापारी यांना सुविधा देण्याचे धोरण घेतले आहे. त्यामुळे शेतमालाची आवक वाढली. नाशिकपेक्षा श्रीगोंद्यात एक रुपया का होईना भाव जास्त आहे. -अजित जामदार, संचालक, बाजार समिती, श्रीगोंदा

बाजारपेठेत होत असलेली कांद्याची आवक आणि त्या प्रमाणात ग्राहक नाही. त्यामुळे कांद्याचे भाव कमी झाले आहेत. आम्हालाही कमी भावाचा धंदा परवडत नाही, पण शेवटी नाईलाज आहे. - लौकिक मेहता, कांदा व्यापारी, श्रीगोंदा

टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरीश्रीगोंदा