निर्यातबंदी उठल्यानंतरही सोलापूर बाजार समितीत कांद्याचा दर अद्याप पडलेलाच आहे. शनिवारी २४ पोती कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात केवळ ५५७ रुपये पडले. रानातील कांदा मार्केटपर्यंत आणण्याचा खर्चही शेतकऱ्याच्या पदरात पडलेला नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. सोलापूर बाजार समितीत शनिवारी १६७ ट्रक कांद्याची आवक होती. सरासरी क्विंटलचा दर १००० रुपये मिळाला आहे. सध्या उन्हाळी कांदा विक्रीसाठी येत आहे. शिवाय चाळीतील कांदाही शेतकरी आता विक्रीसाठी काढत आहे.
पाऊस पडल्यास कांदा खराब होईल, म्हणून मिळेल, त्या दरात विक्री करीत आहेत. शनिवारी मारुती खांडेकर या शेतकऱ्याने २४ पोती कांदा विक्रीसाठी आणला होता. त्या शेतकऱ्यास कांद्याच्या लागवडीला ५८ हजार रुपये खर्च आला आहे.
२४ पोती विक्रीतून २८६६ कांद्याची पट्टी आली. त्यात हमाली, तोलाई आणि वाहन खर्च वजा करून त्याला फक्त ५५७ रुपये मिळाले. त्यामुळे हताश होऊ शेतकरी घरी निघून गेला.
वाहन भाडे २१२० रुपये
मारुती खांडेकर यांच्या कांदा पट्टीत वाहन भाडे २१२० रुपये लावण्यात आले आहे. २८६६ रुपयांतून भाडे गेल्यानंतर हाती काहीच राहिलं नाही. त्यात हमाली ९६ रुपये, तोलाई ५७ आणि महिला हमाली ३६ रुपये वजा जाऊन शेतकऱ्याच्या हातात ५५७ रुपये पडले.