रमेश यादव
शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकऱ्यांचे पिवळे सोने घरातच काळवंडत आहे. सध्या ४३०० ते ४४०० रुपये प्रति क्विंटल भाव असलेल्या शेतकऱ्यांत नाराजी आहे. परिणामी, या दरात उत्पादन खर्चही निघत नसल्याने अस्मानी बरोबर सुलतानी संकटाची प्रचिती येत आहे.
परभणी जिल्ह्यातील रामपुरी बु, परिसरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भावामध्ये खूपच तफावत असल्याने शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन पीक यावर्षी शेतकऱ्यांनी भाववाढीच्या आशेवर घरामध्ये साठवून ठेवले. पण यावर्षी सोयाबीनचे भाव दिवसेंदिवस खालावत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
शेतीसाठी देवाण घेवाण करण्यासाठी शेतकऱ्यांना आता सोयाबीन विकल्याशिवाय पर्याय न राहिल्याने आज शेतकरी हा संकटात सापडला असून भाववाढीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला समाधानकारक दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन घरामध्ये ठेवले. पण त्यानंतर सोयाबीनचे दर घसरले ते आजही सुधारले नाहीत.
गुढीपाडवा जवळ आल्याने सालगडी, बैलजोडी, मजुरांसाठी पैशांची जुळवाजुळव शेतकरी करीत आहेत. मात्र, सध्या सोयाबीनला मिळत असलेल्या कमी भावामुळे शेतीखर्च निघणे कठीण झाले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने सोयाबीनचे भाव वाढवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
दरवाढ होण्याऐवजी घसरण
• सलग तीन वर्षांपासून सोयाबीनचे दर कमी राहिले आहेत. त्याने ५ वर्षांपूर्वी १० हजारांचा टप्पा ओलांडला होता. तदनंतर प्रतिक्विंटल मागे ७ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला होता. तो भाव मिळेल म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी दोन वर्षापासून सोयाबीन विकले नाही.
शेतीपूरक हा जोधंदा करेल मालामाल; वराह पालनात मोठ्या संधी
• यंदा तिसरे वर्ष उजाडले तरी दरवाढ होण्याऐवजी घसरण पहावयास मिळाली. तूर्तास लवकर दरवाढ होण्याची शक्यताही दिसून येत नाही. म्हणून कवडीमोल दराने सोयाबीन विकावे लागत असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.
शेतकरी पीक बदलण्याच्या तयारीत
• दरवर्षी सोयाबीनच्या भावात घट होत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुढील वर्षी सोयाबीन पीक बदलण्याच्या तयारीत आहेत. पेरणीपासून काढणीपर्यंत मोठा खर्च होत आहे; परंतु, भाव घसरत असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.
उत्पादनात मोठी घट
• प्रतिवर्षीपेक्षा यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले. त्यामुळे पालम तालुक्यात १५ दिवसांच्या उशिराने पेरणीला सुरुवात झाली. पुढे सोयाबीन वाढीच्या कालावधीत तब्बल २५ दिवसांचा खंड पडला. परिणामी, पिकाची वाढ खुंटल्याने फळ फांद्यांची संख्या कमी झाली. त्यातून फळधारणा देखील घटली. त्यामुळे सोयाबीनच्या उताऱ्यात घट पहावयास मिळाली.
• जवळपास प्रति बेंगमागे ३ ते ५ क्विंटल उत्पादन घटले. या अस्मानी संकटाचा सामना करावा लागलेल्या सोयाबीन उत्पादकांवर सुलतानी संकट ओढवले आहे.