उन्हाळ कांद्याच्या दरात गेल्या ६ दिवसांमध्ये ३०० रुपये प्रतिक्विंटलने घसरण झाली असून, महागाईनुसार कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कांद्याची लागवड करून चूक केली का, असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लासूर स्टेशन हि प्रसिद्ध कांदाबाजारपेठ आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत असलेल्या कांदा मार्केटमध्ये मोकळ्या कांद्याचा लिलाव होतो. जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी कांदा विक्रीसाठी येथे आणतात. यंदा खत, बियाणे, रोप, लागवड, काढणीच्या मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत.
त्याचप्रमाणे पावसाचे प्रमाण जेमतेम असल्याने विहिरींनी तळ गाठला असून, बोअरवेल कोरडे पडत आहेत. मोठ्या परिश्रमातून शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. असे असताना वातावरणात सतत बदल होत असल्याने उत्पादन घटले आहे.
अशा अनेक संकटांशी सामना करत निघालेला उन्हाळ कांदा शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. मात्र येथेही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे. सहा दिवसांपूर्वी १ हजार ६७५ रुपये प्रतिक्विंटल दराने विकणारा कांदा आता १ हजार ३६१ रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री होत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहेत. उन्हाळ कांद्याच्या दरात वाढ होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
यातून शेतकऱ्यांनी आलेला कांदा घरातच साठवून ठेवला आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे शासनाने कांद्याला कमीत कमी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल हमी भाव जाहीर करावा, अशी मागण शेतकरीवर्गातून होत आहे.
१४ मार्च रोजीचे उन्हाळ कांदा दर
कमी : ५०० रुपये प्रति क्विंटल
जास्त : १६७५ रुपये प्रति क्चिटल
सरासरी : १४८५ रुपये प्रति क्विंटल
एकूण लिलाव झालेली वाहने : १८६
२० मार्च रोजीचे उन्हाळ कांदा दर
कमी : ५१५ रुपये प्रति क्चिटल
जास्त : १३६१ रुपये प्रति क्विंटल
सरासरी : १११५ रुपये प्रति क्चिटल
एकूण लिलाव झालेली वाहने : १०८
लागवडीचा खर्च अधिक अन् दर कमी
• शेतकऱ्यांना एक एकरवर उन्हाळी कांदा लागवडीसाठी सरासरी ५० हजार रुपये खर्च येतो. यात नांगरणी, लागवडीसाठी मजुरी, रोपे, कोळपणी, सरी सोडणे, फवारणी, काढणी आणि बाजार समितीपर्यंत पोहोचवणे इत्यादी खर्चांचा यात समावेश होतो.
• कांद्याला बाजारात चांगला दर मिळाला तरच शेतकऱ्यांना कांदा परवडतो, अन्यथा पदरमोड करावी लागते, हा अनुभव शेतकऱ्यांना येत आहे.