रहिमतपूर : आले उत्पादक शेतकऱ्यांनी सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. बाजारपेठेत आले पिकाची मागणी कमी झाल्याने दर पडले आहेत. दोन-तीन दिवसात बाजारपेठ सुरळीत होईल. शेतकऱ्यांनी एकजूट राहिल्यास आले पिकाची जुनी-नवी पद्धत मुळासकट उपटून काढू,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी आले व्यापाऱ्यांना दिला आहे.
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व आले उत्पादक शेतकऱ्यांच्यात बैठक झाली. यावेळी नगरसेवक अनिल गायकवाड, राहुल निकम, प्रशांत जाधव यांच्यासह रहिमतपूर, नहरवाडी, जयपूर, आर्वी, वाठार किरोली आदी गावांतील आले उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी आले खरेदीत पुन्हा जुने आणि नवे आले पद्धत सुरू करून शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. त्यामुळे आले उत्पादक अडचणीत सापडला आहे. काही व्यापाऱ्यांनी आले खांदणी बंद ठेवून अडवणूक सुरू केली आहे. व्यापारी दर पाडून शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत.
पुणे, मुंबईसारख्या मार्केटमध्ये बसून या भागातील आले खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दबाव आणून शेतकऱ्यांना लुटण्याचे षडयंत्र रचत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. अनिल पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जुने आणि नवे आले अशी प्रतवारी न करता सरसकट आले खरेदीसाठी तीव्र आंदोलन उभे केले आहे.
नवे, जुने आले अशी प्रतवारी न करता सरसकट आले खरेदी करावी म्हणून अनेक दिवस आंदोलन, निवेदन, बैठका, सभा घेऊन प्रबोधन चालू आहे. त्याला यश येऊन सरसकट आले घेण्याचा निर्णय घेतला असला, तरीही काही मस्तवाल व्यापारी या नियमाचे पालन करत नाहीत. त्यामुळे आले व्यापारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना असा संघर्ष पेटला आहे.
त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीला अनुसरून ठिकठिकाणच्या बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन सरसकट आले खरेदी करण्याचा आदेश काढला आहे. त्यालाही काही व्यापाऱ्यांनी विरोध सुरू केला आहे. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी उत्तर प्रदेशमधील लोडर, पुणे-मुंबईतील मोठे व्यापारी आंदोलन शेतकऱ्यांचे तोट्याचे आहे.
आले माल शिल्लक राहील, भविष्यात दर पडतील, अशी अनाठायी भीती घालून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. आले उत्पादक शेतकऱ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता एकजुटीने सरसकट आले विक्रीवर ठाम राहावे. शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी आहे, असे आश्वासन अनिल पवार यांनी दिले.
राजू शेट्टी मैदानात उतरणार● स्वाभिमानी शेतकरी संघटना आले व्यापाऱ्यांच्या मनमानी लुटीविरोधात लढत असताना भांबावलेल्या आले उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांना स्वतः आंदोलनाच्या मैदानात उतरावे लागणार आहे.● आले उत्पादक शेतकयांना न्याय देण्यासाठी राजू शेट्टी यांना साकडे घालण्यात आले आहे. त्यांनी आले उत्पादकांना न्याय देण्यासाठी स्वतः रहिमतपूरमध्ये येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लवकरच रहिमतपूरमध्ये आले उत्पादक शेतकयांच्या हक्कासाठी संघटनेच्यावतीने मेळावा घेणार असल्याचे अनिल पवार यांनी सांगितले.