नामदेव मोरे
नवी मुंबई : वर्षभरातील निर्यातबंदीचा कांदा उत्पादकांबरोबरच गहू व तांदूळ उत्पादकांना प्रचंड फटका बसला आहे. गव्हाची निर्यात तब्बल २६ पट घसरली असून वर्षभरात ४५ लाख टन कमी निर्यात झाली. त्यामुळे ११,३७७ कोटींचे नुकसान झाले.
तांदळाचीही ७७ लाख टन निर्यात कमी होऊन १७,२७८ कोटींचे नुकसान झाले. अन्नधान्यांच्या निर्यातीमधील घट शेतकऱ्यांसाठी व देशासाठीही चिंताजनक समजली जात असून एकूण २८,६५५ कोटींचे नुकसान झाले आहे.
कृषिप्रधान भारताचा अन्नधान्यांच्या निर्यातीमधील वाटा २०२३-२४ या आर्थिक वर्षात कमी झाला आहे. एप्रिल ते फेब्रुवारीदरम्यान अपेडाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार गहू, तांदळाच्या निर्यातीमध्ये प्रचंड घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभर भारतीय गव्हाला प्रचंड मागणी वाढली होती. २०२१-२२ या आर्थिक वर्षात भारताने ७२ लाख ३९ हजार टन गहू निर्यात केला. १५,८४० कोटींची उलाढाल झाली होती. पण २०२२-२३ मध्ये निर्यात घटून ४६ लाख ९३ हजार टन झाली.
उलाढालही ११,८२६ कोटीपर्यंत खाली आली. २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशात गव्हाचा तुटवडा होईल या भीतीने निर्यातीवर निर्बंध टाकण्यात आले. यामुळे आर्थिक वर्षातील ११ महिन्यांत निर्यात २६ टक्क्यांनी घटून १ लाख ७९ हजार टनांवर आली. उलाढालही फक्त ४४९ कोटी रुपये झाली आहे. गहू निर्यातीमधील ही घसरण अत्यंत
चिंताजनक समजली जात आहे.
बिगर बासमती तांदूळ निर्यात
वर्ष | निर्यात (टन) | किंमत (कोटी) |
२०२०-२१ | १,३०,९५,१३० | ३५,४७६ |
२०२१-२२ | १,७२,६२,२३५ | ४५,६५२ |
२०२२-२३ | १,७७,८६,०९२ | ५१,०८८ |
२०२३-२४ | १,००,८१,०५७ | ३३,८१० |
गहू निर्यातीचा तपशील
वर्ष | निर्यात (टन) | किंमत (कोटी) |
२०२०-२१ | २०,८८,४८७ | ४,०३७ |
२०२१-२२ | ७२,३९,३६६ | १५,८४० |
२०२२-२३ | ४६,९३,२६४ | ११,८२६ |
२०२३-२४ | १,७९,८१७ | ४४९ |
• भारतीय तांदळालाही जगभर मागणी आहे. २०२२-२३ मध्ये १ कोटी ७७ लाख टन तांदूळ निर्यात केला होता. निर्यातीमधून ५१,०८८ कोटींची उलाढाल झाली. २०२३-२४ वर्षात निर्यात १ कोटी टन झाली आहे.
• तांदळाला जगातील १५० देशांमधून मागणी आहे. बिगर बासमती तांदळावरील निर्बंधामुळे या निर्यातीमध्येही घट झाली आहे.
अधिक वाचा: Ration Card कागदी रेशनकार्ड होणार आता इतिहासजमा; मिळणार आता ई-शिधापत्रिका