Join us

शेतकरी म्हणतात; तो पर्यंत सोयाबीन घरातच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 7:54 PM

सोयाबीनच्या दरात काय होतोय बदल आणि का शेतकरी म्हणतोय तो पर्यंत सोयाबीन घरातच ठेवली जाणार वाचा सविस्तर.

हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये रविवारी भुसार बाजारात हरभऱ्याची आवक सुरू झाली. बाजारपेठेत नवीन हरभऱ्याला ५४०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. परंतु सोयाबीनचे भाव मात्र स्थिरच होते. जोपर्यंत सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही. तोपर्यंत सोयाबीन घरातच ठेवले जाणार, असे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले.

सद्यस्थितीत तरी नवीन हरभऱ्याची अल्प प्रमाणावर आवक सुरू झालेली पाहायला मिळाली, जवळा बाजार येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो. बाजारात परिसरातील जवळपास ५० गावांतील शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत असतात.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये भुसार बाजारात शेतमाल खरेदी सुरू असून यामध्ये नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे. यामध्ये नवीन हरभऱ्याला ५४०० रुपये भाव मिळत आहे. सद्यस्थितीत तरी अल्प प्रमाणात नवीन हरभऱ्याची आवक सुरू आहे. आवक जादा झाल्यास पुन्हा भाव कमी होऊ लागतात, अशी शेतकऱ्यांना काळजी वाटत आहे.

बाजारपेठेत सोयाबीनचे भाव स्थिर असून ४२०० ते ४३०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भावाने खरेदी केली जात आहे. तर सध्या बाजारपेठेत कापसाला ७६०० ते ७८०० रुपये भाव मिळत आहे. मागील पंधरा दिवसांपेक्षा १ हजार रुपये कापसाच्या भावात दरवाढ झाली आहे. तर हळदीलाही सध्या चांगला भाव मिळत आहे. मात्र नवीन हळदीची आवक सुरू झाल्यास हळदीचे भाव कमी होतील, अशी शेतकऱ्यांना आहे.

अनेक दिवसांपासून शेतीमालाला भावच मिळत नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल वखार महामंडळ व घरी साठवून ठेवला आहे. आज ना उद्या भाव वाढेल या अशाने शेतकरी शेतीमाल विकत नाहीत. परंतु आजतरी सोयाबीनचे भाव स्थिरच आहेत. दुसरीकडे हरभ-यालाही कमी दर मिळत आहेत.चार मित्रांनी उभारला नैसर्गिक ऊसाच्या उत्पादनाचा ब्रॅंड  

शासनाने लक्ष देण्याची मागणी

यावर्षी खरीप हंगामापासून शेतकरी अडचणीत सापडला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कीड व अळ्यांचा प्रादुर्भाव. यामुळे शेतीमाल कमीच झाला. त्यातच शेतीमालाला भावही मिळत नाही. शेतीमाल कितीही चांगला असला तरी त्यात त्रुट्या काढून तो डागी आहे, असे म्हणत कमी भाव दिला जात आहे. तेव्हा शासनाने शेतकऱ्यांची काळजी घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :बाजारमार्केट यार्डमार्केट यार्डशेती