Join us

हिंगोली मार्केट यार्डात शेतकऱ्यांच्या हळदीवर पावसाचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2023 4:23 PM

येथील बाजार समितीचे हळद मार्केट यार्ड सर्वदूर प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात. सध्या दररोज तीन ते पाच हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे.

हिंगोली येथील संत नामदेव मार्केट यार्डातील टिनशेडमधून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या मालाच्या थप्प्या हलत नसल्याने शेतकऱ्यांचा माल पावसात ठेवण्याची वेळ येत आहे. गुरुवारी लिलावासाठी टाकण्यात आलेले हळदीचे ढीग पावसाच्या पाण्यात भिजले. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला.

येथील बाजार समितीचे हळद मार्केट यार्ड सर्वदूर प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी हळद विक्रीसाठी आणतात. सध्या दररोज तीन ते पाच हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. आवक वाढत असली तरी बाजार समितीच्या वतीने मात्र आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत. प्रामुख्याने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतमालाच्या थप्प्या टिनशेडमधून हलत नसल्यामुळे शेतकऱ्यांची हळद टाकण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही.

मागील दोन दिवसांपासून अधूनमधून पाऊस सुरू आहे. या परिस्थितीतही हळद मार्केट यार्डातील टिनशेडमधून व्यापाऱ्यांच्या मालाच्या थप्प्या इतरत्र हलविल्या जात नसल्याने शेतकऱ्यांचा माल पावसात भिजण्याची वेळ येत आहे. गुरुवारी मार्केट यार्ड आवारासह स्टेशन रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जवळपास तीनशेंवर वाहने रांगेत उभी होती.

दरम्यान, भाव वधारल्याने आवक वाढली आहे. बुधवारी रात्रीपासून हळद विक्रीसाठी घेऊन आलेल्या वाहनांची रांग जुने पोलिस अधीक्षक कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौकापर्यंत पोहोचली होती. सुमारे तीनशे ते चारशे वाहने रांगेत उभी होती. सकाळी मार्केट यार्ड आवारात या वाहनांना प्रवेश देण्यात आल्यानंतर रांग कमी झाली.

हळदीच्या ढिगावर पावसाचे पाणीमागील दोन दिवसांपासून हळद विक्रीसाठी दाखल झालेल्या शेतकऱ्यांचा नंबर गुरुवारी लागला. लिलावासाठी हळद ओट्यावर टाकण्यात आली आणि त्याच वेळी पावसाच्या सरी कोसळल्या. ओट्याच्या कडेला टाकलेली हळद पावसाच्या पाण्यात भिजली. पाऊस सुरु असतानाही वाहनात हळद भिजू दिली नाही. मार्केट यार्डात आणल्यानंतर मात्र हळद भिजल्यामुळे शेतकयांत संताप व्यक्त होत होता.

संचालकांचे आदेशही खुंटीला ...मार्केट यार्डात हळदीची आवक वाढत असतानाही व्यापायांनी खरेदी केलेल्या हळदीच्या थप्प्या मात्र टिनशेडमधून इतरत्र हलविल्या जात नाहीत. परिणामी, शेतकऱ्यांची हळद टाकण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. हा मुद्दा संचालकांच्या बैठकीत उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली हळद २४ तासांत इतरत्र हलवावी, अशा सूचना केल्या होत्या, मात्र, संचालकांच्या आदेशाकडे बाजार समिती प्रशासनाने कानाडोळा केला आहे.

हळद वाचविण्यास धावपळसध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतकऱ्यांनी हळद विक्रीसाठी आणताना भिजू नये यासाठी वाहनावर मेनकापड झाकून आणले. मार्केट यार्डात हळद टाकल्यानंतर मात्र पावसाच्या पाण्यात हळद भिजली. हळद वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागत होती.

टॅग्स :मार्केट यार्डपाऊसमोसमी पाऊसशेतकरी