सोयाबीनचा दर किमान सात हजार रुपये होईल, या भाबड्या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन घरीच साठवून ठेवले. मात्र, सोयाबीनची दरवाढ न झाल्याने शेतकऱ्यांचे खरीप पिकाच्या पेरणीचे नियोजन कोलमडले आहे. दरवाढ न झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊन उसनवारी किवा खासगी कर्ज काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षाही दर कमी मिळत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तुरीला मात्र प्रति क्विंटल ११ हजारापर्यंत दर मिळत आहे.
सोयाबीनचा दर सहा महिन्यांपूर्वी क्विंटलला सात ते आठ हजार रुपये होता. या आठवड्यात ५००० ते ५२०० रुपये मिळत आहे. सोयाबीनचे क्षेत्र सध्या वाढले आहे. केंद्राच्या
धोरणामुळेही सोयाबीनच्या दरावर परिणाम झाला आहे. दर वाढतील म्हणून शेतकऱ्यांनी ते घरात ठेवले होते; पण दर वाढण्याऐवजी कमीच होत गेले आहेत. सोयाबीनचा दर आज पाच हजारांवर स्थिर राहिला आहे.
बियाण्यांचे सोयाबीन बाजारात दाखल
शेतकयांनी सोयाबीन पेरण्यासाठी साठवून ठेवले होते. पेरणी झाल्यानंतर शिल्लक राहिलेले सोयाबीन बाजारात आले आहे. शेतकन्यांनी आणलेले हे सोयाबीन केवळ दोन ते चार पोती असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दराअभावी शेतकऱ्यांचे नियोजन ढासळले आहे. त्यांची चिंता वाढली आहे.
भाव असेच राहतील
सध्या तुरीची आवक नसल्यातच जमा आहे. त्यामुळे सध्या तुरीचे भाव स्थिर आहेत. पुढे तुरीचे भाव वाढतील, असा अंदाज आहे. तर सोयाबीन ५ हजारांच्या आत आले असून, सोयाबीन ५ हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. सद्यस्थितीत अनेक शेतकरी बियाण्याचे सोयाबीन विक्रीसाठी आणू लागल्याचे दिसून येत आहे, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
शेतातील पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना खर्च येत आहे. सध्या खत, बियाणे, फवारणी, मजुरांचे भाव वाढलेले असताना सोयाबीनचा दर कमी झाला आहे. सध्या मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. - महावीर पाटील, शेतकरी
शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात विक्रीसाठी आल्यानंतर नेहमीच दर कमी होत आहेत. या धोरणामुळे शेतकरी दिवाळखोरीत निघण्याची वेळ आली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या सर्वच शेतमालाला ठोस हमीभाव देण्याची गरज आहे. - संदीप माने, शेतकरी