मारुती वाघ
मोडनिंब येथील बोरांना गुजरात आणि राजस्थानमधून मोठी मागणी होत आहे. दर आठवड्याला पाच ट्रक बोरे परराज्यात जात आहेत. सध्या प्रतिकिलो १८ ते २० रुपये दर मिळत असल्याचे सांगण्यात आले.
मोडनिंब परिसरात उजनी जलाशयाचे पाणी आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बोरीच्या बागा जेसीबीच्या साह्याने काढून टाकल्या. ऊस उत्पादनासह अन्य पिकांकडे शेतकरी वळाला.
मात्र, काही शेतकऱ्यांनी बोरांच्या बागा ठेवल्या आहेत. चार ते पाच रुपये किलो दराने विकली जाणारी बोरे उत्पादन क्षमता घटल्यामुळे तेजीमध्ये विकली जात आहेत.
अरण शिवारातील लहू चव्हाण या शेतकऱ्याने सांगितले की, सध्या १५० बोरांची झाडे आहेत. कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारची बाग आली आहे. यंदाच्या वर्षी २०० ते २५० पिशव्या उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.
सध्या वीस रुपयापर्यंत दर मिळत आहे. अॅपल बोरालाही मागणी आहे. मोडनिंब भागातील बोराला इतर राज्यांतून मागणी येत असल्याचे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
आठवड्याला १५०० पिशव्यांची आवक
मोडनिंब बाजारपेठेतील दर आठवड्याला पाच ट्रक बोरं राजस्थान, गुजरात यासह भुसावळ येथे जात आहेत. आवक कमी झाल्यामुळे दररोज विक्रीसाठी येणारी बोरे आठवड्यातून दोन वेळाच येत आहेत. उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले असूनही आठवड्याला १५०० पिशव्या बोरांची आवक व्यापाऱ्यांकडे होत असल्याचे व्यापारी सोहेल शेठ तांबोळी यांनी सांगितले.
बोरांची बाग जपायची म्हणजे कष्ट मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, दुसरी पिके घेण्यापेक्षा बोरबाग सांभाळण्यातच बरे वाटते. यंदाच्या वर्षी दीड एकर बागेतून चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. - लहू चव्हाण, बोर उत्पादक शेतकरी