Floriculture :
शेषराव वायाळ
एकेकाळी भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर फुले फेकून देण्याची वेळ आली होती. फुले तोडणीचाही खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आले होते. मात्र, आता सुगीचे दिवस आहेत. बाजारात फुलांना आता चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे फुल शेतकरी आता समाधान व्यक्त करत आहेत.
सततचा पाऊस अन् ढगाळ वातावरणामुळे फुलशेतीला 'अच्छे दिन' आले असून, सर्वच फुलांचे भाव कडाडले आहेत. मात्र, पाऊस व ढगाळ वातावरणामुळे उत्पादनात घट होत असल्याने फुलशेतीलाही फटका बसत आहे.
तालुक्यात परतूर, चिंचोली, वलखेड, आनंदवाडी, बामणी, होंडेगाव रेवलगाव, सातोना, हातडी, पाटोदा माव, वरफळवाडी आदी गावात मोठ्या प्रमाणात फुलांची शेती केली जाते.
या तालुक्यातून छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबईसह परप्रांतात ही विविध प्रकारची फुले जातात. या फुलशेतीतून शेतकऱ्यांना नगदी पैसा मिळतो.
त्यामुळे अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळले आहेत. मात्र, या फुलशेतीतही सातत्याने चढ-उतार होत असल्याने उत्पादक अडचणीत येत आहेत. सध्या फुलाला चांगले दर मिळत आहेत.
उन्हाळ्यात भरगच्च कार्यक्रम असतानाही फुलांना भाव मिळाले नाही. यंदा गेल्या २० दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाऊन मशागत करता आली नाही. त्याचप्रमाणे फुलेही तोडता आली नाही. परिणामी, ही फुले झाडावरच गळून गेली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, बाजारपेठेत या फुलांना चांगला दर मिळल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
असे आहेत भाव
फुलाचा प्रकार | आधीचे भाव | आताचे भाव |
गलांडा | १० ते २० | ५० ते १०० रुपये |
गुलाब | ३० ते ३५ | १०० ते १२० रुपये |
काकडा | ८० ते १०० | २०० ते ३०० रुपये |
निशिगंध | ५० ते ८० | १०० ते १५० रुपये |
शेवंती | ७० ते ८० | १५० ते १८० रुपये |
झेंडू | ४० ते ५० | ८० ते १०० रुपये |
रिमझिम पावसामुळे फुलांचे भाव वाढले
* सध्या आहे. सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे या फुलांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पावसामुळे फवारणीही करता येत नसल्यामुळे फुले कीडकी होणे, सडणे, सुकून जाणे आदी प्रकार वाढले आहेत.* सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना या फुलांची आंतरमशागतीची कामे करता येईनासे झाले आहे. या वातावरणामुळे फुलांचे भाव कडाडले असले तरी उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.
फुलांचे भाव वधारले; मात्र फुले मिळेनात
ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे फुले मिळणे शक्य होत नाही. मिळाली तरी खराब होत आहेत. त्यावर फवारणी करावी लागते. पण, पावसामुळे फवारणी करता येत नाही. संकटात असलेली फुलशेती बहरू लागली असली तरी उत्पादनात मात्र घट होत आहे. त्यामुळे आमच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे.
-अशोक काळे, विक्रेता