अविनाश पाईकराव
नांदेड : गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर लगेच ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मीचा सण आला. त्यामुळे बाजारात वेगवेगळ्या फुलांची मागणी वाढली आहे. एरवी २०० ते २५० रुपये किलो रुपये दराने मिळणारी शेवंतीची फुलं मंगळवारी गौरी आवाहनाच्या दिवशी बाजारात तब्बल ५०० ते ६०० रुपये किलो दराने विक्री झाली.
तर महालक्ष्मी पूजनासाठी लागणारे शेवंतीच्या फुलांचे हारही १५०० ते २००० रुपयांपर्यंत विकले गेले. यंदा गौरी गणपतीच्या उत्सवात सर्वच फुलांना चांगला बाजारभाव मिळाल्याचे दिसून येते.
मंगळवारी गौरी आवाहन होते. त्यामुळे शहरातील हिंगोली गेट भागात असलेल्या फूल बाजारात लोकांनी सकाळपासूनच खरेदीसाठी मोठी गर्दी होती. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही फुलांच्या बागा खराब झाल्याने फुलांची आवक घटल्याचे दिसून आले.
त्यामुळे मंगळवारी विविध फुलांसह हारांचेही भाव चांगलेच वधारलेले असल्याचे पाहायला मिळाले. महालक्ष्मी आणि गणपती उत्सवाच्या काळात शेवंती, निशिगंधा, झेंडू, गुलाब, मोगरा यासह विविध फुलांचे हार घेण्यास नागरिक पसंती देतात.
नांदेड जिल्ह्यात शेवंतीचे कमी उत्पादन असले तरी शेजारील राज्यातून हिंगोली गेटच्या फुल बाजारात मंगळवारी मध्यरात्रीच विविध प्रकारची फुले दाखल झाली होती. महालक्ष्मीच्या सणाला शेवंती फुलांच्या हारास अधिक मान असल्याने शेवंतीचे दोन मोठ्या हारांना दीड ते दोन हजारांचा भाव होता.
तर शेवंतीचे दोन छोटे हार आठशेंना विक्री झाले. सणांसुदीच्या काळात पूजनासाठी फुले व हार भरपूर प्रमाणात मिळतील, असे वाटले होते. परंतु फुलांचे भाव गगनाला भिडल्याचे पाहून भाविकांनी थोडी थोडकीच फुले नेऊन श्री महालक्ष्मी व श्री गणरायाचे पूजन केले.
फुले प्रति किलो
शेवंती (पांढरी) | ४२० |
शेवंती (जांभळी) | ५०० |
गुलाब | ३०० |
शिर्डी गुलाब | ४०० |
मोगरा | ६०० |
निशीगंधा | ३५० |
कमळ | ५० रू. (दोन) |
केळीची पाने | ३० रू. |
केळीचे खांब | २० रू. |
नागेली पान (१२ नग) | १५ रु |
हेही वाचा : पाथरुडच्या पेढ्यांची परराज्यांतही गोडी; पेढे निर्मितीमुळे हजारोंच्या हाताला काम