Join us

Flower Market : पितृपक्षात फुलांचा भाव स्थिरावणार असून, दसऱ्याला फुलांचे भाव पुन्हा कडाडतील अशी शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 11:15 AM

स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा गणेश उत्सवामुळे तेजीत होता. पावसामुळे बहुतांशी फुलांची नासाडी झाली होती. त्यामुळे बाजारात फुलांची आवकही कमी होती.

योगेश गुंडकेडगाव : स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा गणेश उत्सवामुळे तेजीत होता. पावसामुळे बहुतांशी फुलांची नासाडी झाली होती. त्यामुळे बाजारात फुलांची आवकही कमी होती.

गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला मात्र फुलांच्या भावात घसरण झाली. आता पितृपक्षात फुलांचा भाव स्थिरावणार असून, दसऱ्याला फुलांचे भाव पुन्हा कडाडतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

स्थिरावलेला झेंडूचा दर यंदा ७० ते ८० रुपये किलो इतका शेताच्या बांधावर झाला आहे. इतर फुलांच्याही बाजारभावात वाढ झाली आहे. गेले दोन महिने झालेल्या मुसळधार पावसाचा फटका फूलशेतीला बसला आहे.

अनेक ठिकाणी फूलशेती कोलमडली आहे. उत्पादनापेक्षा मागणी जास्त आहे. त्यामुळे फुलांना चांगले बाजारभाव मिळत आहे. 

नगर, पारनेर, पाथर्डी, राहुरी, नेवासा तालुक्यांत अनेक शेतकरी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत झेंडू, अस्टर, गुलछडी, जास्वंद, पांढरी शेवंती आदी फुलांचे भरघोस उत्पादन घेतात. मात्र, यावर्षी अनेक गावांत सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे फुलांची रोपे व झाडे वाया गेली.

परिणामतः मोठ्या प्रमाणात मागणी असूनही फुलांचा पुरवठा करता येत नाही, असे अकोळनेर (ता. नगर) येथील फूल उत्पादक शेतकरी तुषार मेहेत्रे यांनी सांगितले. पितृ पंधरवाड्यात झेंडूचे प्रति किलो भाव ३० ते ४० रुपये राहतील. मात्र, नवरात्रीत व दसरा, दिवाळीत फुलांच्या भावात पुन्हा वाढ होईल, असे व्यापारी सांगतात.

फुलांचे दर असे (रुपये/किलो)झेंडू -  ३०शेवंती - ८०गुलाब - २००गुलछडी - १६०

मुसळधार पावसाने फूलशेतीचे नुकसान झाले. यामुळे माल कमी निघाला. नवरात्र व दसऱ्याला आणखी भाव मिळतील. - तुषार मेहेत्रे, फूल उत्पादक शेतकरी

गणेश उत्सवात फुलांना चांगला भाव मिळाला. आता पितृपक्षात फुलांचे भाव स्थिर राहतील. मात्र, दसऱ्याला भाव पुन्हा वाढणार आहेत. - संतोष गोंधळे, फुल व्यापारी

टॅग्स :फुलंबाजारमार्केट यार्डफुलशेतीपाऊसशेतीदसरागणेशोत्सव 2024