रत्नागिरी : जिल्ह्यात झेंडू, लिलीचे उत्पादन घेणारे शेतकरी असले तरी अन्य फुले मात्र कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा येथून येतात. पावसामुळे फुलांच्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे.
गणेशोत्सवामुळे मात्र फुलांच्या मागणीत कमालीची वाढ झाली असून फुलांची मागणी दुप्पट झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. फुलांची आवक घटल्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेने आवक कमी राहिली.
त्यामुळे फुलांचा भाव अधिक आहे. पूजा साहित्याच्या दरात वाढ झाली आहे. गणेशोत्सवात झेंडूसाठी मागणी असल्याने काही शेतकरी झेंडूची लागवड करतात.
मात्र पावसामुळे झेंडूचे पीक खराब झाल्याने त्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघणे अवघड झाले आहे. जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या फुलांवरच जिल्ह्यातील ग्राहकांची भिस्त आहे.
फुलांचे प्रति किलोचे दर
झेंडू - १०० ते १२० रुपये
निशिगंध - ८०० ते ९०० रुपये
शेवंती - २५० रुपये
रुबी गुलाब - ५०० रुपये
डच गुलाब - २५० रुपये (२० नग)
देशी गुलाब - ७०० रुपये (शेकडा)
प्लास्टिक फुलांना मागणी
ताज्या फुलांच्या दरात वाढ झाल्याने प्लास्टिकच्या फुलांना वाढती मागणी आहे. पावसामुळे ताज्या फुलांच्या बाजारपेठेला यावर्षी ८० टक्के फटका बसला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मखर, आरास करण्यासाठी प्लास्टिकच्या फुलांचाच अधिक वापर होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फुलांची आवक ५० टक्केच आहे. अतिवृष्टीमुळे फूल पिकाचे नुकसान झाले आहे. झाडे कुजली, फुलांवर रोग पडला आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाल्याने आवक कमी आहे. त्यामुळे फुलांचे दर तेजीत आहेत. - संतोष चव्हाण