यंदा सोयाबीनची दरकोंडी कायम असताना अलीकडच्या दिवसांत घसरलेली हळदही वधारत नसल्याचे चित्र हिंगोलीच्यामार्केट यार्डात पाहावयास मिळत आहे. एप्रिल, मे महिन्यात सरासरी १६ हजारांचा पल्ला गाठलेली हळद सध्या १४ हजार रुपये क्विंटलने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
गतवर्षी पावसाचा लहरीपणा, सोयाबीन ऐन भरात असताना येलो मोॉकचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्याखाली आले. अशा परिस्थितीत सोयाबीनला किमान ६ हजारांचा भाव मिळेल, अशी आशा होती. परंतु, सोयाबीनने पाच हजारांचा पल्लाही गाठला नाही.
परिणामी, शेतकऱ्यांचा लागवड खर्चही वसूल झाला नाही. आज-उद्या भाव वाढतील, या आशेवर शेतकऱ्यांनी सहा ते सात महिने सोयाबीन विक्रीविना ठेवले. मात्र, अजूनही दरकोंडी कायम आहे.
सोयाबीनप्रमाणे जवळपास महिन्याभरापासून हळदीचीही दरकोंडी कायम आहे. एप्रिल, मे महिन्यात सरासरी १६ ते १६ हजार ५०० रुपयाने हळद विक्री झाली होती. जून लागताच हळदीच्या दरात घसरण झाली. प्रारंभी जवळपास तीनशे ते पाचशेंनी घसरलेले दर जागेवर येतील, अशी अपेक्षा होती.
मात्र, दर वधारण्याऐवजी घसरत गेले. १ जुलै रोजी १२ हजार ८०० ते १५ हजार ३०० रुपये क्विंटलप्रमाणे हळद विक्री झाली. तर सरासरी १४ हजार रुपये भाव राहिला. आधी सोयाबीन आणि आता हळदही काळवंडल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे.
मोंढ्यात विक्रीस आलेला शेतमाल (क्विं)
१९०० - हळद६५० - सोयाबीन३०० - हरभरा१९० - गहू०८ - मूग
हळद उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षा...
■ मागील सात ते आठ महिन्यांपासून सोयाबीन कवडीमोल दरात विक्री करावे लागत आहे. तर एप्रिल आणि मे मध्ये हळदीला समाधानकारक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.
■ परंतु, जून लागताच भावात घसरण झाली, ती जुलै उजाडला तरी कायम आहे. भाव गडगडल्याने आवकही मंदावली असून, उत्पादक शेतकऱ्यांना हळदीच्या दरवाढीची प्रतीक्षा आहे.
उन्हाळी मुगाला साडेसात हजारांचा भाव
हिंगोली येथील मोंढ्यात उन्हाळी मूग विक्रीसाठी येत असून, १ जुलै रोजी ८ क्विंटल मूग विक्रीसाठी आला होता. ६ हजार ९०० ते ७ हजार ५०५० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तर उन्हाळी सोयाबीनही विक्रीसाठी येत आहे. परंतु, पावसाळीसह उन्हाळी सोयाबीन सरासरी ४ हजार २७० रुपये क्विंटलने विक्री होत आहे.
शेतीमालांना मिळणारा सरासरी भाव
गहू - २,४३०मूग - ७२०२सोयाबीन - ४२७०हरभरा - ६३०५हळद - १४०५०