Join us

फसवणुकीचा अलर्ट! बाजार समितीबाहेर कापूस, मक्याची खरेदी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 7:15 PM

बाजार समितीच्या आवारातच शेतमालाची खरेदी-विक्री करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर काही व्यापाऱ्यांकडून मका, कापूस आदींची बाजारभावापेक्षा वाढीव दराने उधारीवर खरेदी करण्यात येत असल्याची बाब समोर आली असून या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते, असा इशारा बाजार समितीच्या संचालकांनी दिला आहे.

वैजापूर तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरविल्याने कापूस, मका उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. कपाशी वेचण्याचे काम सुरु झाले असन मका काढणीलाही वेग आला आहे. रब्बीची पेरणी व अन्य खचासाठी शेतकऱ्यांनी आपल्याकडील मका व कपाशीला बाजारात विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची निकड लक्षात घेता ग्रामीण भागात खेडा खरेदीचे काटे उभे राहिले आहेत.

या खरेदी केंद्रावर मकाला शहरापेक्षा ५०- १०० रुपये अधिकचा भाव देऊन एक महिन्याच्या उधारीवर सौदे होत आहेत. व्यापारी एक महिन्यानंतरचे चेक देत असल्याने शेतकरी उधारीवर मका विक्री करीत आहेत. गावातच माल विक्री होत असल्याने वाहतक खर्चात बचत होते व दोन पैसे जास्त हातात पडतील, या अपेक्षेने शेतकरी या केंद्रांना पसंती देत आहेत. याचा गैरफायदा संबंधितांकडून घेतला जात असून मालातून कट्टी कपात केली जात आहे. यामुळे एकीकडे बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून दुसरीकडे शेतकऱ्यांची या माध्यमातून फसवणूक होऊ शकते. याबाबत बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन व गणेश इंगळे यांनी शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा दिला असून शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारातच शेतमालाची खरेदी-विक्री करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :मार्केट यार्डधोकेबाजीशेती क्षेत्र