Fruit Market :
गणेशोत्सव, महालक्ष्मी सणानिमित्त देशी, विदेशी फळेबाजारपेठेत दाखल झाले आहेत. सध्या फळांचे भावही वाढले असून, ग्राहकांकडून मागणीही अधिक आहे. नुकताच विविध व्रत-वैकल्यांचा पवित्र श्रावण मास संपला आहे. त्यापाठोपाठचा गणेशोत्सवामुळे आरोग्यासाठी लाभदायी ठरणाऱ्या फळांची मागणी वाढली आहे.
ही मागणी फक्त देशी फळांनी पूर्ण होणे शक्य नाही. त्यामुळे येथील बाजारपेठेत देशीसह विदेशी फळांचाही बोलबाला दिसून येत आहे. केळी, सफरचंदपासून नासपती, ड्रॅगन फ्रूट आदी फळे बाजारात उपलब्ध आहेत.
नागरिकांना माफक दरात त्यांची चव चाखायला मिळत आहे. हल्ली सणासुदीचे, व्रत-वैकल्यांचे दिवस सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विशेषतः महिलावर्गाकडून फळांना मागणी आहे.
देशी, विदेशी फळे उपलब्ध
शहरात ९ ते १० मोठे फळ विक्रेते आहेत. हे फळ विक्रेते नाशिक, पुणे, जळगाव, धुळे, सुरत, मुंबई येथील घाऊक विक्रेत्यांकडून देशी, विदेशी फळे आणून विक्री करतात. त्यात सफरचंद (हिमाचल प्रदेश), रॉयल गाला सफरचंद (न्यूझीलंड), मॅट्रिन संत्री (अमेरिका), द्राक्षे (नाशिक), मोसंबी (नागपूर), डाळिंब (पुणे, कऱ्हाड,
सटाणा), पपई (सोलापूर), चिकू (बलसाड, डहाणू), किवी (अरुणाचल प्रदेश), पेरू (पुणे), कोहळा (पुणे), नारळ (केरळ) यांचा समावेश आहे.
फळबाग उत्पादकांना सुगीचे दिवस
खामगाव जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी फळबागा लावल्या आहेत. सिंचनाची सोय असल्यामुळे जिल्ह्यात प्रामुख्याने संत्रा, पपई, लिंबू, केळीच्या फळबागा वाढल्या आहेत. सध्या फळांची मागणी वाढली आहे. तसेच भावही चांगले मिळत आहे. केळीला ४० ते ५० रुपये डझन भाव मिळत आहे. त्यामुळे फळबागा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत.
नागरिकांचा फलाहारावर भर
आरोग्याबाबत विशेष काळजी घेणारी मंडळी या दिवसात हलका आहार व फलाहारावर भर देतात. त्यामुळे बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात देशी, विदेशी
फळांना मागणी दिसून येत आहे. देवाच्या पूजेसाठीही फळांची गरज भासते. त्यामुळे मागणी वाढली आहे. फळांची मागणी वाढल्याने भावातही वाढ झाली आहे.
येथे मिळतात फळे
खामगाव शहरात अग्रसेन चौक, मुख्य बाजार लाइन, जलंब नाका, घाटपुरी नाका, बसस्थानक परिसर, टॉवर चौकात फळांची दुकाने लागली आहेत.
असे आहेत दर
फळ | दर |
सफरचंद | १०० ते १२० |
चिकू | १५० ते १८० |
रॉयल गाला सफरचंद | २५० |
अननस प्रती नग | २५ ते ३० |
पपई | ३० ते ५० |
नारळ प्रती नग | ३० ते ५० |
मॅट्रिन संत्री | २५० |
कोहळा | ३० ते ४० |
संत्री | २०० |
पेरु | ८० ते १०० |
ड्रॅगन फ्रूट | १६० ते २०० |
सीताफळ | १२० ते १५० |
नासपती | १८० ते २०० |
द्राक्षे | २०० ते २५० |
डाळिंब | १०० ते १६० |
इलायची केळी | १५० ते १६० |
मोसंबी | ५० ते ६० |
किवी ३ नग | १०० ते १२० |