मागील काही दिवसांपासून लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत बाजारसमित्यांमधीलकांदाबाजारभाव सुमारे २५ टक्क्यांनी वधारले असून सध्या कमीत कमी १००० रुपये तर सरासरी २ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळत आहेत.
चांगले बाजारभाव मिळत असल्याने नाशिक जिल्ह्यातील बाजारांसह देशातील कांदा बाजारपेठांमध्ये मागील आठवड्यात कांद्याची आवक ७ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. भाव वाढल्याने शेतकरी कांदा बाजारात आणतानाचे चित्र आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभाव वाढण्याची अपेक्षा असून पुढील काळात बाजारभाव कसे राहतील याचा अंदाज शेतकरी घेताना दिसत आहेत. ‘लोकमत ॲग्रो’ने या क्षेत्रातील जाणकारांशी बोलून आगामी कांदा बाजारभावांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला आहे.
यंदाचा कांदा उत्पादन अंदाज काय आहे?
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि इतर सरकारी स्रोत संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संकलित केलेल्या विविध बागायती पिकांचे क्षेत्र आणि उत्पादनाबाबतचा २३-२४ वर्षासाठी दुसरा आगाऊ अंदाज प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार येणारे वर्ष २३-२४ (दुसरा आगाऊ अंदाज) मध्ये २४२.१२ लाख टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित आहे. जे मागील वर्षीच्या ३०२ लाख टनाच्या तुलनेत सुमारे ६० लाख टनांनी कमी असेल. या अंदाजानुसार महाराष्ट्रातील कांदा उत्पादन ११२.६ लाख क्विंटल असेल.
निर्यातदारांचा काय आहे अंदाज?
यंदा पाऊसमान चांगले असेल त्यामुळे कृषी विभागाने दिलेल्या माहितीपेक्षा कांदा उत्पादन चांगले होऊ शकते, असे अनुमान कांदा निर्यातदारांच्या प्रतिनिधींनी सांगितला आहे. त्यामुळे यंदा कांदा उत्पादन २५० लाख मे. टनापेक्षा जास्त होऊ शकते असाही निर्यातदारांचा अंदाज आहे. मागच्या वर्षी मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील कांद्याला उशिरा सुरू झालेल्या मान्सूनचा फटका बसला होता. यंदा मॉन्सून चांगला झाला, तर ऑगस्टमध्येच कर्नाटकातील साऊथ बेलोरी कांदा बाजारात दाखल होऊ शकतो. याशिवाय मध्य प्रदेशमध्येही कांदा उत्पादन चांगले राहण्याची शक्यता आहे. कृषी मंत्रालय उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये होणारे कांदा उत्पादन गृहित धरत नाही. पण देशाला २५ दिवस पुरेल इतके कांदा उत्पादन या दोन्ही राज्यांत होते. हे सर्व गृहित धरता यंदा कांदा उत्पादन चांगले असणार आहे.
उत्पादकतेबद्दल शास्त्रज्ञ काय सांगतात?
कांदा उत्पादकतेबद्दल राहुरी कृषी विद्यापीठातील कांदा पैदासकार डॉ. बी.टी. पाटील यांनी सांगितले की खरीप कांद्याची उत्पादकता हेक्टरी १५ ते १६ टन, लेट खरीपची १७ ते १८ टन, तर रब्बी किंवा उन्हाळी कांद्याची उत्पादकता सरासरी २० टन इतकी आहे. इतर विकसनशील देशांच्या तुलनेत राज्याची आणि भारतातील कांद्याची उत्पादकता कमी आहे.
पाऊस जास्त किंवा अपुरा झाला तरी त्याचा कांद्याच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. कांद्याच्या कोणत्या अवस्थेत त्याला नैसर्गिक हवामानाचा त्रास सहन करावा लागतो, म्हणजे सुरूवातीची, मधली किंवा काढणीची अवस्था, यावरही कांदा उत्पादकता अवलंबून असते. मागच्या वर्षी कांदा काढणीच्या दरम्यान पाऊस पडल्याने अनेकांचा कांदा शेतातच सडला आणि उत्पादकता घटली. याशिवाय कीड, रोगांमुळेही कांदा उत्पादन घटते. कीड-रोगांचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास कधी कधी २० ते ६० टक्के इतकी घटही उत्पादनात पाहायला मिळते, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे कांदा उत्पादनाचे खरीपपूर्व अंदाजामध्ये प्रत्यक्ष लागवडीनंतर फरक पडू शकतो. कांदा बाजारभाव ठरवताना ही गोष्टही विचारात घेतली पाहिजे.
सध्या निर्यातीची काय स्थिती आहे.
देशात यंदा सुरूवातीला निर्यातीवरील निर्बंध आणि नंतर ४० टक्के निर्यात शुल्क आणि ५५० डॉलर निर्यातमूल्याची अट कांदा निर्यातीसाठी घालण्यात आली. त्यामुळे मे महिन्यात खऱ्या अर्थाने कांदा निर्यात होऊ शकली. कांदा निर्यातदारांच्या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण मे महिन्यात केवळ ६५ हजार मे. टन अंदाजे कांदा निर्यात झालेली आहे. मागील वर्षी निर्यातीवर निर्बंध नसल्याने २५.२५ लाख मे. टन इतकी कांदा निर्यात झाली होती. त्या तुलनेत यंदाची निर्यात कमी आहे.
निर्बंधामुळे आपल्या कांद्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत जास्त आहे. तुलनेत पाकिस्तानने स्वस्तात कांदा विकल्याने त्यांच्या कांद्याला मागणी जा्स्त होती. भारतात निर्यातबंदी झाल्याचा फायदा पाकिस्तानने उचलला आणि या काळात तब्बल २०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची कमाई कांदा निर्यातीतून पाकिस्तानला झाली, तर २ लाख २० हजार मे. टन कांद्याची निर्यात करून चांगले परकीय चलन कमावले. विशेष म्हणजे देशात कांद्याच्या किंमती ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचल्या असतानाही पाकिस्तानने निर्यातीवर निर्बंध घातले नाहीत. याचे कारण त्यांना भारताशी स्पर्धा करून परकीय चलन कमवायचे होते.
पाकिस्तान बांग्ला देशातील कांद्याची काय स्थिती
लवकरच पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानमधील सिंध कांदा काढणीला येणार असून त्या देशात कांद्याची उपलब्धता वाढेल. कांदा आयातदार असलेल्या दुसऱ्या शेजारी देशात, म्हणजेच बांग्लादेशात सध्या स्थानिक कांद्याचा हंगाम सुरू आहे. मे आणि जूनपर्यंत हा हंगाम चालतो. त्यामुळे त्यांच्याकडे कांद्याची मागणी घटली आहे. याशिवाय बकरी ईदच्या सुटी निमित्त १३ ते १९ दरम्यान बांग्लादेशातील कांदा निर्यात ठप्प होईल. त्याचा काहीसा परिणाम भारतातील कांदा बाजारभावावर होतील. दुसरीकडे बकरी ईदच्याच सणामुळे पाकिस्तानतील कांदा बाजार आणि निर्यात व्यवहारांना १७ ते २२ जूनदरम्यान सुटी असेल. त्यामुळे या देशातून कांदा निर्यात होऊ शकणार नसले, तरीही त्याचा फारसा परिणाम भारतीय कांद्याच्या निर्यातवाढीत होणार नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कांद्याच्या किंमती वाढतील का? असा आहे अंदाज
कांद्याची लासलगाव बाजारातील मागील सप्ताहातील (१० जूनला संपलेल्या) सरासरी किंमत रु. १९६७ प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत २५ टक्केनी वाढ झाली आहे. देशपातळीवर कांद्याच्या आवकमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत ७ टक्केनी वाढ झाली असल्याची माहिती पुणे येथील स्मार्ट प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. केंद्र सरकार आणि सरकारी यंत्रणांनी कांदा उत्पादन यंदा कमी राहिल असा अंदाज वर्तविल्याने सध्या व्यापाऱ्यांसह, नाफेडसारख्या सरकारी एजन्सी कांदा साठवणुकीवर भर देत आहेत.
त्यामुळे मागच्या आठवड्यात कांदा वधारल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार ही स्थिती जुलैपर्यंत कायम राहिल. परिणामी जुलैच्या मध्यापर्यंत कांद्याचे बाजारभाव वधारू शकतील. तर सध्या जून-जुलै दरम्यान कांदा बाजार जास्तीत जास्त २ ते ३ रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. थोडक्यात जून आणि जुलै महिन्यापर्यंत कांद्याची बाजारातील संभाव्य सरासरी किंमत २ हजार ते २५०० रुपयांपर्यंत राहू शकते. त्यानंतर खरीप, लेट खरीप लागवड, मॉन्सूनचा अंदाज यावरून किंमतीचा पुढील अंदाज घेता येईल, असेही निर्यातदारांचे म्हणणे आहे.