Join us

पान उत्पादकांना यंदा गणपती बाप्पा पावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2023 7:02 PM

पान उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पानावरच संपूर्ण पान व्यवसायाची भिस्त आहे. यासाठी शेतकऱ्यांपासून पान वितरणापर्यंत हजारो हातांना काम मिळते.

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील लाखो लोकांच्या हाताला काम देणाऱ्या पान उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही गणपती बाप्पा पावला आहे. मागणी वाढल्यामुळे नेहमीपेक्षा दर दुपटीने वाढला आहे.

पान उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या पानावरच संपूर्ण पान व्यवसायाची भिस्त आहे. यासाठी शेतकऱ्यांपासून पान वितरणापर्यंत हजारो हातांना काम मिळते. यावर लाखो लोकांचे संसार अवलंबून आहेत. पान उत्पादक शेतकरी, शेतमजूर, पान वाहतूकदार, पान दुकानदार, होलसेल व किरकोळ पानविक्रेते असे अनेकांचे संसार फुलले आहेत.

वर्षातून एकदा येणाऱ्या गणपती व दसरा सणावरच पान व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळते. यावेळी लाखो रुपयांची उलाढाल खाऊच्या पान बाजारात होते. दोन वर्षांपासून व कोरोना काळात पानव्यवसायाच्या दराला मरगळ आली होती. मात्र यावर्षी विघ्नहर्त्याच्या आगमनाने उत्पादकांवरील विघ्न दूर झाले आहे. सारेच मालामाल झाले आहेत.

एरवी १० कवळीच्या कळी पानांच्या एका डप्यास म्हणजे ३ हजार पानांना (एक पानांची कवळी म्हणजे ३०० पाने) ३०० ते ४०० रुपये मिळणारा भाव गणेशोत्सवामुळे ८०० ते १००० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. यामध्ये सिंगल मोठवड पानांचा दर १ हजार ५०० रुपये पर्यंत आहे.

या व्यवसायावर मंदीचे सावट आले असताना दरवाढीमुळे उत्पादक शेतकऱ्यांसह यावर अवलंबून असलेल्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनानंतर पान उत्पादक व त्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांपुढे उभे राहिलेले विघ्न दूर झाले आहे. त्यामुळे बाप्पा पावल्याचा आनंद व्यक्त होत आहे.

दर कायम राहण्याची अपेक्षायाबाबत पान उत्पादक शेतकरी श्रीअंश लिबिकार्ड यांनी गणरायाचा आशीर्वादाने पानांना दर असाच कायम राहिल्यास यावर अवलंबितांचे प्रश्न मार्गी लागतील, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :पीकगणपतीगणेशोत्सवशेतकरी