Join us

फूल उत्पादकांना गणराया पावला आठवडाभर फुल बाजारात राहणार तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 12:29 PM

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फुलांची रेलचेल पहावयास मिळत आहे. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात थोडी वाढ झाली आहे. निशीगंध, जरबेरा, झेंडू, शेवंती, गलांडा या फुलांना मागणी अधिक असली, तरी तेजीही खूप आहे.

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फुलांची रेलचेल पहावयास मिळत आहे. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात थोडी वाढ झाली आहे. निशीगंध, जरबेरा, झेंडू, शेवंती, गलांडा या फुलांना मागणी अधिक असली, तरी तेजीही खूप आहे.

निशीगंध फुलाचा दर ९०० रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. 'शेवंती', 'झेडू'च्या दरातही महिन्याभरात दुप्पट वाढ झाली आहे. यंदा या फुलांपैकी झेंडूचा भाव वधारला असून, दहा दिवसांत प्रतिकिलो १४० रुपयांवरून त्याचे दर २०० रुपयांवर पोहोचले आहेत.

शहरी आणि ग्रामीण भागात सध्या गणपती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील निरनिराळ्या बाजारपेठांमध्ये विविध प्रकारची फुले खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. मागील चार दिवस फुलांना मागणी वाढली आहे. याबरोबर फुलांच्या किमतीदेखील वाढत आहेत.

फुलांचे दर वाढल्यामुळे हारांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे ग्राहकांचा स्वस्त हार खरेदी करण्याकडे कल अधिक आहे. वाढत्या उन्हाच्या झळांमुळे माल खराब होत असल्याने मोजकाच माल आणावा लागत आहे.

एकंदरीत बाजारपेठेतील अर्थचक्र काही प्रमाणात गतिमान झाले आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी झेंडूची किंमत ही १४० रुपये होती. आता किंमत २०० रुपये झाली आहे. लहान हार २५ रुपयांत मिळत होता. तो ५० रुपयापर्यंत गेला आहे.

पावसामुळे झाली फुलांची नासाडी• गेली दोन महिने पाऊस सुरू आहे. त्यातही गेल्या आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यासह सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असल्याने त्याचा फटका फूल उत्पादकांना बसला आहे.• अनेक ठिकाणी अतिपावसाने फुले कुजली आहेत, तर दोन महिने पाऊस राहिल्याने फुलांच्या बागाच उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्याचा परिणामही सध्या बाजारातील फूल आवकेवर दिसत आहे.

आठवडाभर बाजारात राहणार तेजीगणेशोत्सवात फुलांची मागणी वाढतेच, मात्र यंदा आवक कमी असल्याने दर वाढले आहेत. अनंत चतुर्दशीपर्यंत फुलांना तेजी राहणार आहे. त्यानंतर दर कमी होणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

किरकोळ बाजारातील फुलांचे दर असेफुलाचा प्रकार - दर प्रतिकिलोगलांडा - २०० ते २२५निशीगंध - ८०० ते ९००चायना गुलाब - ३०० ते ४००भगवा झेंडू - १५० ते १६०पिवळा झेंडू - १३० ते १५०शेवंती - ३५० ते ४००

पुष्पहाराचे दर असेएक ते दीड फूट लांब निशीगंध - १५०झेंडू - ५०शेवंती -  ६०मोठा झेंडू - १५०निशीगंध - २००शेवंती - २१०गुलाब - ७०० रु. पासून पुढेबाॅम्ब हार - ५५०

टॅग्स :फुलंफुलशेतीशेतकरीबाजारमार्केट यार्डशेती