उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचे दर चांगलेच चढले असून, लसणाच्या दरातही तेजी कायम आहे. किरकोळ बाजारात दर्जेदार लसणाला पाव किलोसाठी ५० ते ६० रुपये मोजावे लागत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यांतील उष्णतेच्या लाटेमुळे पाण्याचे जिवंत स्रोत कमी झाले. यामुळे भाजीपाल्याचे मळे कमी झाले. परिणामी वांगे, शेवगा, गवार सोडता टोमॅटो, कोबी, लसूण, भेंडी यांसह इतर भाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत.
मे महिन्यापासून जिल्ह्यातील विविध भागांत अवकाळी पावसाचा तडाखा सुरूच आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात रब्बी हंगामात लसणाचे उत्पादन अत्यंत कमी झाले.
यात भरीस भर अवकाळीच्या वातावरणामुळे उपलब्ध लसूण, कांदा खराब होत आहे. तसेच राजस्थान आणि गुजरातमधून होणारी आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात लसणाची आवक कमी झाल्याची माहिती धाराशिव बाजारात समितीच्या निरीक्षकांनी दिली.
घाऊक बाजारात सध्या १० किलो लसणाला प्रतवारीनुसार ८०० ते १००० रुपये असे दर मिळत आहेत. किरकोळ बाजारात एक किलो लसणाची विक्री प्रतवारीनुसार २०० ते २५० रुपये किलो दराने होत आहे. सोबतच पालेभाज्याही महागल्या आहेत.
अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याचा फटका
जिल्ह्यातील भाजीपाल्यावर प्रथम उष्णतेच्या लाटेचा परिणाम झाला आहे. त्यानंतर अवकाळी पावसामुळे उत्पादित मालावर परिणाम होत आहे. काढलेल्या कांदा व लसणावर परिणाम होत आहे. कांदे नासत असून लसूण खराब होत आहे. भाजीपाल्याची फूलगळती होऊन रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे.
या भाज्या स्वस्त
किरकोळ बाजारात सध्या वांगे, शेवगा, कांद्याची आवक अधिक आहे. यामुळे दर अत्यंत कमी आहेत. यामुळे शेतकऱ्यांना बाजारात आणण्याचा खर्चही निघत नाही.
या भाज्या महाग
किरकोळ बाजारात बटाटे, भेंडी, कोबी, टोमॅटोचे दर चढे आहेत. सध्या बटाटे ३० ते ४० रुपये किलो, टोमॅटो ३०, भेंडी ६० रुपये किलो, कोबी ६० रुपये किलोने विक्री सुरू आहे.
पालेभाज्याही महाग
मेथी, शेपू, चुका, पालक १० ते २० रुपयांपर्यंत पेंढी मिळत आहे. यामध्ये १० रुपयांना पालक, शेपू १५ ते २०, तर मेथी २० रुपयांना पेंढी मिळत आहे.
भाजी विक्रेते म्हणतात....
बाजार समितीत आवक कमी झाल्याने टोमॅटोसह इतर काही भाज्यांचे दर वाढत आहेत. वांगे, शेवगा शेंगांचे दर काही प्रमाणात कमी आहेत. अवकाळी पावसामुळे उपलब्ध भाजीपाल्यावर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे आवक घटत आहे. - सविता कांबळे, शेतकरी.
आवक घटल्याने भाज्या महाग
बाजार समितीत पालेभाज्यांची आवक घटली आहे. यामुळे भाव चांगलेच चढे आहेत. स्थानिक व परराज्यांतून लसणाची आवकही कमी आहे. यामुळे लसूण, टोमॅटो, कोबी, भेंडीचे दर चढे आहेत. अवकाळीत भिजल्याने कांद्याचे दर अत्यंत कमी झाले आहेत. - युवराज अडसूळ, निरीक्षक, बाजार समिती.
हेही वाचा - Success Story शेडनेट, पॉलिहाऊसमधून काकडी, शिमला मिरचीचे लाखोंचे उत्पन्न