राम मगदूमगडहिंग्लज : डाळी, तांदूळ व कांद्यापाठोपाठ लसणानेही यंदा सर्वसामान्य माणसाला रडवले आहे. कमी पर्जन्य, अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे लसणाचे देशातील उत्पादन घटले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा लसणाचा भाव दुपटीपेक्षा जास्त वाढला आहे. जिल्ह्यात सध्या लसणाचा दर प्रतिकिलो ३२० ते ५०० रुपये इतका आहे. गेल्या २० वर्षात प्रथमच एवढा उच्चांक गाठला आहे.
गेल्यावर्षी फेब्रुवारीत घाऊक बाजारातील लसणाचा दर प्रतिकिलो ७० ते १२० रुपये किलो होता. आज २०० ते ३५० रुपये आहे. त्यामुळे पावकिलोला ८० ते १२५ रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या २० वर्षांत लसणाचा दर पहिल्यांदाच ५०० च्या घरात दर गेला आहे.
देशात प्रामुख्याने मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, ओडिशा, पंजाब, आसाम, हरयाणा, पश्चिम बंगाल व महाराष्ट्र या राज्यात लसणाचे उत्पादन घेतले जाते. सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेशात होते. यावर्षी खरीप हंगामातील पिकांच्या काढणीला उशीर झाल्यामुळे पुरवठा साखळीवर तसेच लसणाच्या दरावरही परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. देशातील उत्पादन घटल्यामुळेच दर वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
किरकोळ दरातील वाढ (प्रतिकिलो)फेब्रुवारी २०२३ - १२० ते १६० रुपये एप्रिल २०२३ - २०० ते २४० रुपये नोव्हेंबर २०२३ - २३० ते ३२० रुपयेफेब्रुवारी २०२४ - २५० ते ५०० रुपये
• जगात लसणाचे सर्वाधिक २ ते २५ दशलक्ष टन उत्पादन चीनमध्ये तर भारतात ३२.७ लाख टन उत्पादन होते.• चिनी लसणापेक्षा भारतीय लसूण किचित लहान आकाराचा आहे. परंतु, जागतिक बाजापेठेत चिनी लसणाचा दर प्रतिटन १२५० डॉलर तर भारतीय लसणाचा दर ४५० ते १००० डॉलर आहे.• भारतीय लसूण पश्चिम आशियाई व आफ्रिकन देशात जातो.