सध्या बाजारात लसणाच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जेवणातून आता लसणाची फोडणी हद्दपार होत आहे. सोमवारी टेंभुर्णीच्या आठवडी बाजारात लसूण ४०० रुपये किलोप्रमाणे विकला गेला, तर अद्रकीचे भावही १२० रुपये किलोवर गेले आहेत.
भाजीला खमखमीत चव आणणारा लसूण व अद्रक आता सामान्यांच्या फोडणीत दिसले नाही तर कोणाला नवल वाटू नये. आतापर्यंत भाव खात असलेला कांदा मात्र आता बाजारात २० रुपयांना सव्वा किलो मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत भाज्यांतून हद्दपार झालेले कांदे पुन्हा भज्यांची चव वाढविणार आहेच.
बाजारात मेथी आणि कोथिंबिरीच्या दहा रुपयांना चार जुड्या विकल्या गेल्या. यामुळे भाजीपाला उत्पादक अडचणीत आले असून, काहींवर मेथी रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.
आठवडी बाजारात अन्य भाजीपाल्यांचे दर (किलोमध्ये)
हिरवी मिरची ४० रुपये
वांगी ८० रुपये
दोडके ८० रुपये
गाजर ३० रुपये
वटाणा ६० रुपये
गोबी ४० रुपये
बटाटा ३० रुपये
शेवगा ६० रुपये
लसूण घेताना घ्यावा लागला खिशाचा ठाव
वांगी २० रुपये पावने विकली गेली. बाजारात अन्य भाजीपाल्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात असले तरी लसूण व अद्रक खरेदी करताना मात्र खिशाचा अंदाज घ्यावा लागल्याचे काही नागरिकांनी सांगितले. हे लसणाचे भाव नवीन लसूण बाजारात येईपर्यंत कायम राहणार असल्याचेही काही व्यापारी यावेळी म्हणाले.