रोजच्या स्वयंपाकात पदार्थाला चव येण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. परंतु सद्यस्थितीत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लसणाच्या भावात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांकरिता ऐन सणासुदीच्या काळात लसणाची फोडणी महागली असल्याचे पहायला मिळत आहे.
निसर्गाच्या अवकृपेने बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सहा महिन्यांत सलग तिसऱ्यांदा लसणाची फोडणी महागली आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत मोठ्या प्रमाणात सण व सार्वजनिक महोत्सव आहेत.
त्यामुळे लसणाला स्वयंपाकात फारसे प्राधान्य दिले जात नाही. त्यामुळे लसणाचा भाव गगनाला भिडला गेला आहे. एरव्ही विविध कार्यक्रमातील स्वयंपाकात लसूण महत्त्वाचा आहे.सण, उत्सवामध्ये लसूण वापरला जात नसला तरी जिल्ह्यातील विविध लहान- मोठ्या हॉटेलमध्ये चटकदार पदार्थ, स्वादिष्ट भोजन तयार करण्यासाठी लसूणच वापरला जातो. लसणाला भाव वाढल्यामुळे उत्पादकांतून समाधान व्यक्त केले जात आहे
तीनशे रुपये किलो दर
सध्या बाजारपेठेत लसूण ३०० रुपये प्रतिकिलो असून, आगामी डिसेंबरपर्यंत लसणाची भाववाढ कायम राहते की वाढते हे सांगणे कठीण आहे. नोव्हेंबर महिन्यात दीपावली सण असल्याने विविध फराळाचे पदार्थ तयार करण्यास मोठ्या प्रमाणात लसूण महत्त्वाचा आहे. एकंदरीतच विविध सण व सार्वजनिक महोत्सवांमध्ये लसणाचे वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता सद्यस्थितीत घरोघरी लसणाची फोडणी महागली आहे.
लसूण पीक घेणारे अनेक शेतकरी
लसूण पीक घेणारे अनेक शेतकरी वसमत तालुक्यात आहेत. परंतु भाव मिळत नसल्यामुळे अनेकांनी लसूण शेती करणे सोडून दिले आहे. परंतु सध्या भाव मिळत असल्यामुळे लसूण शेती करावी, असे अनेक शेतकऱ्यांना वाटत आहे. -गोपाळ दळवी, शेतकरी
लसूण हा गुणकारी असून अनेक जाणकार लसणाची फोडणी पदार्थाला देत असतात. आता सणवार असल्यामुळे बहुतांश लोक लसूण खात नाहीत. त्यामुळे सध्या तरी लसणाला चांगला भाव मिळत आहे. - शाम इंगोले, शेतकरी
असा राहिला लसणाचा भाव
महिना | दर (रु. किलोमध्ये) |
जानेवारी | २०० |
फेब्रुवारी | २०० |
मार्च | १६० |
एप्रिल | १५० |
मे | १८० |
जून | २०० |
जुलै | २०० |
ऑगस्ट | १६० |
सप्टेंबर | ३०० |