नामदेव मोरे
नवी मुंबई : वर्षअखेरीस लसूणच्या Garlic Market दरवाढीचा विक्रम झाला होता. यावर्षीही हंगामाच्या सुरुवातीपासूनच दरवाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी जूनच्या सुरुवातीला बाजार समितीमध्ये लसूण ४० ते ६५ रुपये किलो दराने विकला जात होता. यावर्षी हेच दर ९० ते २२० रुपयांवर पोहोचले आहेत.
किरकोळ मार्केटमध्ये २८० ते ३०० रुपये किलो दराने लसूणची विक्री होत आहे. प्रत्येक वर्षी जानेवारीमध्ये लसणाचा हंगाम सुरू होतो. जूनपर्यंत त्याचे दर घसरत असतात; परंतु यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच लसूण तेजीत आहे. राज्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये ८० ते २३० रुपये किलोपर्यंत दर आहेत.
मुंबई बाजार समितीमध्येही गतवर्षीच्या जून महिन्यापेक्षा बाजारभाव दुप्पट झाले आहेत. लसणाचे उत्पादन कमी झाले असल्यामुळे हा फरक पडत आहे. दिवाळीदरम्यान काही प्रमाणात दर कमी होतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईमध्ये मध्य प्रदेश, गुजरात उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश व इतर भागांतून लसूण विक्रीसाठी येत असतो. सर्वांत जास्त आवक मध्य प्रदेशमधून होत असते. हंगामाच्या सुरुवातीला वाढलेले भाव पाहता यावर्षीही लसणाची फोडणी महागच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून लसणाचे दर वाढल्याने गृहिणींचे स्वयंपाक घरातील बजेट कोलमडले आहे.
राज्यातील लसूणचे प्रतिकिलो दर पुढीलप्रमाणे
बाजार समिती - बाजारभाव
मुंबई - ९० ते २२०
अहमदनगर - ८५ ते २३०
छत्रपती संभाजीनगर - ६५ ते २२०
नाशिक - ११५ ते २३०
पुणे - ९० ते २३०
नागपूर - ५० ते १८०
सोलापूर - ९० ते २५०
मुंबईमध्ये जानेवारी ते मार्चदरम्यान टप्प्याटप्प्याने नवीन मालाची आवक होत असते. यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे दर वाढले आहेत. दिवाळीदरम्यान दर कमी होतील. मुंबईत मध्य प्रदेश व इतर राज्यांमधून आवक होत असते. - दीक्षित शहा, लसूण व्यापारी
लसूणची हंगामाच्या सुरुवातीपासून कमतरता भासत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने दर वाढले आहेत. अजून चार महिने दर तेजीत राहतील. - अशोक वाळुंज, संचालक, कांदा-लसूण मार्केट