Garlic Market :
कडा :
मागील दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने नवा लसूण बाजारात आला नाही. त्यामुळे लसणाने यंदा चांगलाच भाव खाल्ला. सध्या बाजारात लसूण चक्क ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो तर दर्जेदार कांद्याचा भाव प्रतिकिलो ४० ते ४५ रुपये झाल्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात कांद्यालाही लसणाची चांगलीच फोडणी बसल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.
असे असले तरी ऐन सणासुदीच्या कालावधीत कांदा, लसून उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्यांदाच अच्छे दिन आले आहेत. एक वर्षापूर्वी जवळपास ४०० ते ५०० रुपये प्रति किलोवर जाऊन पोहोचला आहे.
सर्वसामान्यांना मात्र लसणाने घाम फोटला आहे. लसणाने पुन्हा दरवाढीचा उच्चांक गाठला आहे. सध्या किरकोळ बाजारात पाव किलो लसणाला ८० ते १०० रुपये मोजावे लागतात. तर दुसरीकडे बाजारात दर्जेदार कांद्याच्या दरातही ४० ते ४५ रुपये प्रतिकिलोपर्यंत भाववाढ झाली आहे.
कांदा, लसणाने ऐन सणासुदीच्या कालावधीत पुन्हा एकदा चांगलाच भाव खाल्ला म्हणावा लागेल. त्यामुळे कांदा व लसूण उत्पादक शेतकऱ्यांना कधी नव्हे ते अच्छे दिन आल्यामुळे बळीराजा सुखावला, असला तरी भाजीपाल्यामधील भाववाढीमुळे सर्वसामान्य गृहिणींचे बजेट मात्र कोलमडले आहे.
पावसामुळे आवक घटली
■ मागील दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने कायम ठिय्या मारल्याने नवा लसूण आला नाही.
■ त्यामुळे बाजारात लसणाची आवक घटली असल्यामुळे लसणाच्या दरात वाढ झाली असल्याचे किरकोळ लसूण विक्रेत्यांकडून सांगण्यात येते.
एमआरपीमुळे कांदा दरात वाढ
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी झालेल्या लिलावात ७ ते ८ हजार कांदा गोण्यांची आवक झाली. प्रथम दर्जाच्या कांद्याला ४ हजार
ते ५ हजार १००, क्रमांक दोनच्या कांद्याला ४ हजार ते ४ हजार ५००, तर क्रमांक तीनच्या कांद्याला ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये कांदा उत्पादकांना भाव मिळाला. सरकारने एक्सपोर्टची एमआरपी कमी केल्यामुळे कांद्याच्या दरात भाववाढ झाल्याने शेतकरीदेखील सुखावला आहे. - बबलू तांबोळी, कांदा व्यापारी, कडा