मागील काही महिन्यांत लसूण महाग झाल्याने दररोजच्या भाजीतील चव गायब झाली होती. आता नवीन लसूण बाजारात आल्यामुळे ३०० रुपयांवर गेलेला दर १५० ते २०० रुपयांवर आला आहे.
भाजी चमचमीत होण्यासाठी फोडणी दिली जाते. त्यात तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, मिरची, हिंगाचा वापर केला जातो.त्याशिवाय त्यात लसणाची भूमिकाही महत्त्वाची असते. काही महिन्यांपूर्वी लसणाचे दर चांगलेच गगनाला भिडले होते.
३०० रुपये मोजूनही गावरान लसूण मिळत नव्हता. आता बाजारात नवीन लसणाची आवक वाढत आहे. त्यामळे ३०० रुपये किलोने विक्री होणारा गावरान लसूण आता १५० ते २०० रुपयांना मिळू लागला आहे.
कुठून येतो लसूण
सध्या हिंगोलीच्या बाजारात परजिल्हा व परराज्यातून लसणाची आवक होत आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरीही नवीन लसूण बाजारात विक्रीसाठी आणत आहेत.
कांद्याच्या दरात किंचित वाढ
जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी कांद्याच्या वाढत्या दराने नागरिकांच्या डोळ्यात पाणी आणले होते. मात्र, त्यानंतर परजिल्ह्यातील नवीन कांदा बाजारात येत असल्याने कांद्याचे दर चांगलेच घसरले होते. ४० ते ५० रुपये दराने विक्री होणारा कांदा १५ ते २० रुपये किलो दराने विक्री होत होता. आता पुन्हा यात किंचित वाढ झाल्याचे पाहावयास मिळत असून, २० ते २५ रुपये दराने विक्री होत आहे.
गेल्या आठवड्याच्या शेवटचे शनिवार (दि.१६) राज्यात लसणाला मिळालेला दर व आवक
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
अकलुज | --- | क्विंटल | 8 | 10000 | 13000 | 12000 |
अहमदनगर | --- | क्विंटल | 27 | 5000 | 15000 | 10000 |
अकोला | --- | क्विंटल | 118 | 8000 | 11500 | 10000 |
जुन्नर - नारायणगाव | --- | क्विंटल | 6 | 5000 | 12000 | 10000 |
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 34 | 5000 | 9000 | 7000 |
राहता | --- | क्विंटल | 3 | 10000 | 13000 | 11500 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | लोकल | क्विंटल | 288 | 5000 | 12000 | 8500 |
सांगली -फळे भाजीपाला | लोकल | क्विंटल | 11 | 4000 | 11000 | 7500 |
पुणे-मोशी | लोकल | क्विंटल | 30 | 800 | 10000 | 9000 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 880 | 3000 | 11000 | 9000 |