जामखेड तालुक्यातील जवळा येथील आठवडे बाजारात स्वयंपाक घरात अत्यावश्यक असलेला लसूण ५०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. आवक घटल्याने लसणाच्या भावाने उसळी घेतली. इतर भाजीपाला मात्र स्वस्त दराने विकला जात आहे.
जवळा येथे नांदणी नदीच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत आठवडे बाजार भरतो, या आठवडे बाजारात शेजारील मतेवाडी, मुंजेवाडी, खुंटेवाडी, हळगाव, गोयकरवाडी आदी गावांतील
हजारो शेतकरी, ग्राहक, महिलावर्ग शेतमाल, भाजीपाल्याची खरेदी विक्रीसाठी येतात. स्वयंपाकघरात कांदा, बटाटा, लसूण आवश्यक असतो, याशिवाय स्वयंपाक पूर्ण होऊ शकत नाही. सध्या कांदा व बटाट्याला बाजारभाव नसल्याने उत्पादक शेतकरी नाराज आहेत. मात्र, लसणाची अचानक भाववाढ झाली.
सध्या लसणाची राज्यभर टंचाई निर्माण झाल्यामुळेही तेजी असल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दिवाळी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लगनसराई सुरू झाली. त्यात लसणाची आवक कमी असल्यामुळे लसणाचे भाव गगनाला भिडले आहेत. एरवी जास्तीत जास्त १०० ते १५० रुपयांपर्यंत किलो दराने मिळणारा लसूण आता पाचशे रुपयांवर पोहोचला आहे. १०० ते १२० रुपये पाव या दराने विक्री होत आहे.
थंडीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात नागरिक लसणाचा वापर करतात. लसूण हृदयासाठी चांगला मानला जातो, तसेच नॉनव्हेज खाणारे नागरिक याचा मोठ्या प्रमाणात भाजी बनविताना वापर करतात. त्याचप्रमाणे शाकाहारी नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणात फोडणीकरिता लसणाचा वापर करतात.