खरीप हंगामातील पावसाळी बाजरीची येथील मोंढ्यात आवक होत असून, रोज दोन ते चार क्विंटल आवक होत आहे. हिरवीगार, चवदार असलेल्या गावरान बाजरीने चांगलाच भाव खाल्ला असून, किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलोपर्यंत विकली जात आहे. त्यापाठोपाठ उन्हाळी बाजरीला मागणी असून, बाजारात इतर अन्नधान्याचे भाव देखील तेजीत आहेत.
थंडीचे दिवस आणि महिनाभरावर आलेल्या संक्रांतीच्या सणात बाजरीला मागणी वाढते. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात खरीप हंगामातील पावसाळी बाजरीची रोज दोन ते चार क्विंटल आवक होत आहे. या बाजरीला मागणी सुद्धा चांगली आहे.
यंदा खरीपात पाऊसमान कमी असल्याने बाजरीचे क्षेत्र घटले. शेतकऱ्यांना खाण्यापुरतेही उत्पादन झाले नाही आणि त्यामुळे बाजारात खूप कमी प्रमाणात आवक आहे व त्यामुळे भाव वधारले आहेत. त्यातच आता थंडी सुरु होते आहे त्यामुळे बाजरीच्या मागणीत वाढ होऊन भाव अजून वाढतील अशी शक्यता आहे.