बाजारात घेवड्याला मागणी असून क्विंटलला ११ हजारांपर्यंत भाव येत आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे सोयाबीनला मात्र पाच हजारांखालीच दर आहे. परिणामी शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण आहे. त्यातच यंदाही सोयाबीन क्षेत्रात वाढ असून लवकरच नवीन आवक सुरू होणार असल्याने त्याचाही परिणाम दरावर होण्याची भीती आहे.
सातारा जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वात मोठा समजला जातो. कारण, जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे सुमारे 3 लाख हेक्टर आहे. गेल्यावर्षी सोयाबीनचे ६८ हजार हेक्टर निश्चित करण्यात आले होते; पण प्रत्यक्षात ८७ हजार हेक्टरवर सोयाबीन पीक घेण्यात आले होते. तर यंदाच्या खरिपातही सोयाबीनचे क्षेत्र सुमारे ७५ हजार हेक्टर क्षेत्र अंदाजे होते. तरीही प्रत्यक्षात ८५ हजार ८०० हेक्टरवर सोयाबीन घेण्यात आले आहे. याला कारण म्हणजे सोयाबीनला चांगला भाव मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढला; पण सध्या सोयाबीनच्या दरात उतार आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबरनंतर सोयाबीनचा दर वाढला. साडेपाच हजारांवर आला; पण त्यानंतर दरात घसरण झाली. पाच हजारांच्या खाली भाव आला. गेले काही महिने सोयाबीनचा क्विंटलचा भाव पाच हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे दराची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आता काय करायचे असा प्रश्न पडलेला आहे. त्यातच सोयाबीनचे क्षेत्र टिकून असल्याने उत्पादन वाढणारच आहे. तसेच लवकरच नवीन उत्पादनही येणार आहे. त्यामुळे सोयाबीन घरात ठेवूनही पुढे दर मिळेल का याची शाश्वती नाही.
यंदा ८५ हजार हेक्टर क्षेत्र- सोयाबीनला चांगला दर मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून सोयाबीन क्षेत्रात वाढ होत चालली आहे.- गेल्यावर्षी खरीप हंगामात तब्बल ८७ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. टक्केवारीत हे प्रमाण १२७ होते- यावर्षी कृषी विभागाने ७४ हजार ८०० हेक्टर क्षेत्र निश्चित केले. प्रत्यक्षात सुमारे ८६ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.