जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गेल्या वर्षी अद्रकला चांगला दर मिळाला असून, शेतकरी एकाच एकरात मालामाल झाले होते. त्यामुळे यंदा राजूरसह परिसरातील ३० टक्के शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक लागवड केली आहे.
मात्र, यंदा ठोक विक्रेते १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलने अद्रक खरेदी करीत आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या वर्षी १२ ते १५ हजारांचा भाव मिळाला होता. यंदा भाव नसल्याने अद्रकीचे पीक शेतातच वाळत असल्याचे दिसून आहे.
यंदा जूनपासून समाधानकारक पाऊस होता. त्यामुळे अद्रकचे पीकही जोमात आले. शेतात चांगले उत्पन्न मिळावे, यासाठी शेतकऱ्यांनी महागड्या औषधींची फवारणी केली होती. आता अद्रक काढणीसाठी आले असून, ठोक व्यापारी थेट बांधावर येऊन खरेदी करीत आहेत. अनेक शेतकरी नगदी पीक म्हणून अद्रककडे वळले आहेत.
इतर मालाला चांगला भाव मिळत नसल्याने अनेकांनी कापूस, सोयाबीन, मकाऐवजी अद्रक लागवडीवर भर दिल्याचे दिसून आले. ढगाळ वातावरण व अवकाळीमुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावर फवारणी केली. त्यामुळे मशागतीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर निघत आहे.
या परिसरातील शेतकऱ्यांचा अद्रककडे कल
• यंदा राजूरसह पळसखेडा ठोंबरे, चांदई एक्को, बाणेगाव, चांदई टेपली, चांदई ठोंबरे, खापरखेडा, तपोवन, थिगळखेडा आदी परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अद्रकची लागवड केली होती.
• आता शेतकरी ही अद्रक मजूर लावून काढली जात आहे. मात्र, बाजारपेठेत व्यापारीही कमी दराने खरेदी करीत आहेत. त्यामुळे अद्रकीसाठी केलेला मशागतीचा खर्च यंदा निघत नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
दहा हजारांचा भाव द्यावा
गेल्या वर्षी अद्रकला १२ हजार रूपये भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा तीन एकरात अद्रक लावली आहे. मात्र, आता व्यापारी कमी दराने खरेदी करीत आहेत. त्यामुळे मशागतीचाही खर्च निघणे अवघड आहे. परिणामी, अद्रकला किमान दहा हजार रुपये भाव द्यावा, अन्यथा आर्थिक मदत करावी. - बाबासाहेब टोम्पे, उत्पादक शेतकरी.
हेही वाचा : अहो ... सरपंच साहेब विसरू नका बरं; 'या' आहेत तुमच्या कामाच्या जबाबदारी