प्रताप महाडिककडेगाव : मागील काही वर्षांपासून 'आले' उत्पादक शेतकऱ्यांत दर पडल्याने मरगळ आलेली होती; पण यावर्षी चालू असलेल्या बाजारपेठेच्या वाढत्या दराने बियाण्याच्या दरातही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च एकरी लाखो रुपयांच्या घरात गेला आहे.
हा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे, तर पारंपरिक आले उत्पादक शेतकऱ्यांत वाढत्या दराने समाधानाचे वातावरण आहे. कडेगाव तालुक्यासह सर्वत्र हेच चित्र दिसत आहे. वाढत्या भांडवली खर्चाने, पाण्याच्या अभावामुळे बहुतांशी शेतकऱ्यांना आल्याच्या पिकाकडे दुर्लक्ष केले होते.
मात्र, यावर्षी याचा नेमका परिणाम म्हणून आल्याच्या दरात भरघोस वाढ झाली आहे. बाजारपेठेतील आले १०० रुपये प्रतिकिलोपेक्षा अधिक आहे. आधी लावलेल्या बियाण्यासाठी १२० ते १५० रुपये प्रतिकिलो असा दर आहे.
आले लागवड करण्यासाठी एकरी सुमारे हजार ते पंधराशे किलो बियाणे लागत असून, याचा खर्च लाखाच्या वर जात आहे. खते, औषधे, मशागत याचा खर्च एकरी २ लाखांच्या वर जात आहे.
यामुळे साधारणपणे आले लागवडीसाठी एकरी तीन ते साडेतीन लाख इतका खर्च येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आले पिकाबाबत द्विधा मनस्थिती आहे. पारंपरिक शेतकरी दराबाबत समाधानी आहेत.
आले लागवड नको रे बाबा!आले लागवडीचा आवाक्याबाहेरचा खर्च पाहता यावर्षी आले उत्पादन घेण्यासाठी इच्छुक असलेले सामान्य शेतकरी हा खर्च पाहून यावर्षी नवीन आले लागवड नको, असे म्हणत आहेत. पारंपरिक आले उत्पादक मात्र आले पिकाला मिळत असलेल्या विक्रमी दराने खुश आहेत.
अधिक वाचा: Turmeric हळद लागवडीच्या या टीप्समुळे मिळेल लाखोंचे उत्पादन