गजानन मोहोड
अमरावती : कॉटन बेल्ट म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यात दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकरी कापसाची साठवणूक करीत आहेत. त्यामुळे खुल्या बाजारात आवक थांबल्याचा थेट फटका
६० पेक्षा अधिक जिनिंग प्रेसिंगच्या युनिटला बसला.
या सर्व युनिटमध्ये क्षमतेच्या २५ टक्केच काम होत आहे. त्यामुळे किमान ५ हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सरासरीपेक्षा जास्त पावसाने कपाशीचे मोठे नुकसान झाले, शिवाय बोंडअळी, बोंडसड आणि आता लाल्याने दोन ते तीन वेच्यात उलंगवाडी होईल. त्यात खुल्या बाजारात कापसाला ७ हजार २०० व सीसीआयमध्ये ७ हजार ४५० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे.
वेचणीचे दर १० किलोच्या वर पोहोचले आहेत. शिवाय पेरणी ते वेचणीदरम्यान वाढलेल्या प्रचंड उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा बाजारभाव भाव अत्यल्प आहे. त्यामुळे दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचा कल साठवणुकीकडे असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारातील कापसाची आवक जवळपास बंद झालेली आहे.
अशा परिस्थितीत जिल्ह्यातील ६० वर जिनिंग उद्योग संकटात आले आहेत. बहुतांश जिनिंग उद्योग दर्यापूर, अंजनगाव, वरुड व अमरावती भागात आहेत. सद्यस्थितीत कापूसच उपलब्ध नसल्याने या युनिटमध्ये क्षमतेच्या फक्त २५ टक्केच काम होत आहे. त्यामुळे या उद्योगात असलेल्या कामगारांपैकी ८० टक्के कामगारांवर आता दुसरे काम शोधण्याची वेळ आली आहे.
ब्राझिलमध्ये कापसाचे बंपर उत्पादन
देशांतर्गत या वर्षी सरासरी उत्पादनात कमी आलेले आहे. त्या तुलनेत प्रमुख कापूस उत्पादक देश असलेल्या ब्राझिलमध्ये कापसाचे बंपर उत्पादन झालेले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची डिमांड कमी झालेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इतर निर्यातदार देशांच्या तुलनेत भारताचे दर जास्त असल्यानेही मागणीत कमी आल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
चार दिवस एक शिफ्ट, तीन दिवस बंद
जिल्ह्यातील बहुतेक युनिटमध्ये कापसाची अत्यल्प आवक आहे. त्यामुळे आठवड्यात ४ दिवस एका शिफ्टमध्ये काम व तीन दिवस जिनिंग बंद राहत असल्याने कामगार कपात झाली आहे. सीसीआयच्या केंद्रांतही फारशी आवक नसल्याचे दिसून येते. आवक कमी झाल्याचा सर्वांना फटका बसल्याचे पनपालिया यांनी सांगितले.
कापसाची निर्यात सध्या थांबली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी कमी झालेली आहे. शेतकऱ्यांचा कल सध्या साठवणुकीकडे असल्याने आवक कमी झाल्याने जिनिंगची कामे पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. - अनिल पनपालिया, कोअर कमिटी मेंबर, विदर्भ कॉटन असोसिएशन
कापसाची बाजारस्थिती
खुल्या बाजारात दर | ७१०० ते ७२०० रु. क्विंटल |
सीसीआयचे दर | ७४५० ते ७४७५ रु. क्विंटल |
रुईचे आंतरराष्ट्रीय दर | ७० सेंट पर पाऊंड |
गाठीचे (खंडी) दर | ५२ ते ५३ हजार रु. क्विंटल |
सरकीचे दर | ३२ ते ३३ हजार रु. क्विंटल |