दीड ते दोन महिन्यांपूर्वी नाफेडला विकलेल्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामध्ये सुमारे ६६ शेतकऱ्यांचे पैसे नाफेडकडून थकीत असून उद्यापर्यंत पैसे न मिळाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन उपोषणास बसण्याचा इशारा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे.
नाफेडला विक्री करण्यात आलेल्या कांद्याचे नांदगाव तालुक्याचे साधारण १ कोटी १६ लाख रुपये मिळणे बाकी आहे. अहमदनगर जिल्ह्यातूनही अशाच स्वरुपाच्या तक्रारी येत असल्याचे महाराष्ट्र कांदा उत्पदक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले.
नाफेडसाठी कांदा खरेदी करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघांनी किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कांद्याचे पैसे तत्काळ देणे गरजेचे आहे. परंतु, एक-दोन महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊनही काही शेतकऱ्यांना नाफेडकडून पैसे मिळालेले नाहीत. नाफेडकडून हा कांदा केंद्र सरकारच्या बफर स्टॉकसाठी खरेदी केला जातो. म्हणजे एकप्रकारे सरकारच शेतकऱ्यांना पैसे देण्यास विलंब करत आहे असे म्हणावे लागेल. शेतकऱ्यांनी यापुढे नाफेडला कांदा देऊच नये.- भारत दिघोळे,अध्यक्ष,महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना.
राज्यात दिवाळीला सुरुवात झाली असून कांदा लिलाव १८ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. दिवाळी आणि रविवार जोडून आल्याने बाजार समित्या बंद असल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना नाफेडच्या पैशांची वाट पहावी लागणार असल्याचे चित्र आहे.
आठ दिवस व्यवहार बंद
नाफेडकडून या प्रश्नावर मोघम उत्तरे आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दिवाळीमुळे आठ दिवस व्यवहार बंद राहणार असल्याचे सांगण्यात आल्याने दिवाळीआधी कांद्याचे पैसे मिळावेत यासाठी शेतकऱ्यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.
नाशिकमधील नांदगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा विकला. आता दीड ते दोन महिने उलटून गेले तरी विकलेल्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. नाफेडशी संपर्क साधला असता केवळ १० टक्के रक्कम द्यायची राहिल्याचे सांगण्यात आले. आता दिवाळीला व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. उद्यापर्यंत पैसे न मिळाल्यास शेतकरी बांधवांना सोबत घेऊन उपोषणाला बसण्याचा इशारा आम्ही दिला आहे.-सोमनाथ मगर, राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना,नांदगाव
बाजारसमित्यांमध्ये काम करणारे शेकडो मजूर परप्रांतीय आहेत. दिवाळीचे आठ दिवस ते आपापल्या गावी जातात. त्यामुळे या काळात कांदा लिलाव बंद असतात. दरवर्षी दिवाळीच्या काळात धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजेपर्यंत मजूरांना सुटी असते, तर बाजारसमितीला दिवाळीची अधिकृत सरकारी सुटी असते. त्यामुळे कांदा व्यवहार बंद ठेवावे लागतात. यंदा दिवाळीच्या आधी व नंतर रविवार जोडून आल्याने सुटीचा कालावधी वाढला आहे.