Join us

सोन्याचे दर गगनाला; पांढऱ्या सोन्याच्या दराचे काय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 12:29 PM

हस्तपोखरीत ४० टक्के शेतकऱ्यांच्या घरात कापसाच्या गंजी पडून

यंदा कापसाच्या दरामध्ये मोठा चढउतार होत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चांगला दर मिळेल, या आशेवर कापसाची विक्री केली नाही. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील हस्तपोखरी येथे कापसाचा दर आठ हजारांच्या खाली असल्याने येथील शेतकऱ्यांनी कापसाची विक्री थांबवली आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे कापसाला किडे लागले आहेत. यामुळे घरात ठेवलेल्या कापसामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

आधीच खरीप सह रब्बीत उत्पन्न कमी त्यात यंदा कापसाला चांगला दर नाही. यामुळे शेतकऱ्यांनी कापसाला चांगला दर मिळेल, या आशेवर कापसाची विक्री न करता तो घरातच ठेवला आहे.

दवाखान्याचा खर्च वेगळाच

१. एकीकडे भीषण पाणीटंचाई असल्याने फळाच्या बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे.

२. बागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. हस्तपोखरीसह परिसरात अनेक शेतकऱ्यांकडे कापूस घरातच पडून आहे.

३. त्यात ग्रामीण भागात छोटी घरे असल्याने घरातच कापूस ठेवल्याशिवाय पर्याय नसतो.

४. मात्र कापसात पिसे झाल्याने अंगावर खाज येत असल्याची लक्षणे जाणवत आहेत. यामुळे दवाखाना गाठून औषधोपचार करावा लागत आहे.

कापूस घरातच पडून

हस्तपोखरी येथील सुमारे ४० टक्के शेतकयांच्या घरात कापूस विक्रीअभावी पडून आहे. कापसाच्या पिकावर झालेला खर्चदेखील निघणे मुश्कील झाले असल्याने शेतकऱ्यांनी कापसाची विक्री केलेली नाही. आज भाव वाढेल, उद्या वाढेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

योग्य भाव नाही

माझ्याकडे दोनशे क्चिटल कापूस योग्य दर नसल्याने घरातच पडून आहे. पिकाला अडचण आणि विकायला अडचण अशी गत झाली आहे. योग्य भाव मिळाल्यास कापूस घरात ठेवण्याची वेळ येणार नाही. - दिनेश वाघ, शेतकरी, हस्तपोखरी

टॅग्स :कापूसशेतीशेतकरीमराठवाडाविदर्भबाजार