गेल्या वर्षभरात कांद्याचे दर घाऊक बाजारात ७ ते २२ रुपये किलोपर्यंतच राहिले होते. मात्र, यंदा मान्सून एक महिना उशिरा दाखल झाल्याने कांदा उत्पादनाचे वेळापत्रक बिघडले आहे. सध्या बाजारात नवीन कांद्याची आवक एकदम कमी असल्याने दर वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात ८० रुपये किलोपर्यंत कांदा असून दिवाळीनंतर नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यानंतर दरात हळूहळू घसरण सुरू होईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
उत्पादन कमीकोल्हापूर जिल्ह्यात कांद्याचे खूपच कमी उत्पादन होते. घरात वापरासाठी म्हणून येथील शेतकरी आंतरपीक म्हणून कांद्याचे पीक घेतात. त्यामुळे जिल्ह्यातील चारपैकी एकाही बाजार समितीत स्थानिक कांद्याची आवक होत नाही. तरीही येथे रोज ४० ते ५० ट्रक कांद्याची आवक एकट्या कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत होते. राज्यातील इतर बाजार समित्यांच्या तुलनेत कोल्हापूर बाजार समितीत कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची पसंती राहते.
पावसाचा परिणामगेल्या वर्षभरात कांद्याची आवक जास्त असल्याने दर कमी होते. साधारणतः ७ ते २२ रुपयांपर्यंत हे दर राहिले मात्र, यंदा मान्सून उशिरा दाखल झाला, त्यात पावसाच्या चार महिन्यांत पर्जन्यमानही खूप कमी झाल्याने कांद्याच्या रोप लावणीवर परिणाम झाला. साधारणतः ऑक्टोबर महिन्यात नवीन कांद्याची आवक बाजारात होते. मात्र, यंदा एक महिना उशिरा म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आवक होईल, असे व्यापायांचे म्हणणे आहे. त्यानंतर दर हळूहळू कमी होऊ शकतात.
गेल्या ४ दिवसातील कोल्हापूर बाजार समितीतील कांद्याचे दर
आवक पिशवी | किमान दर (प्रतिकिलो) | कमाल दर (प्रतिकिलो) | |
२५ ऑक्टोबर | ५६२२ | २० | ६० |
२६ ऑक्टोबर | ७७४८ | २० | ६३ |
२७ ऑक्टोबर | १४७८० | २० | ६० |
२८ ऑक्टोबर | १३१२८ | २० | ६० |
येथून येतो कांदा: अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारायेथे पाठवला जातो: तामिळनाडू, गोवा, केरळ, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
कांदा उत्पादक शेतकरी म्हणतात यंदा नवीन कांद्याची आवक नसल्याने दर वाढले आहेत. घाऊक बाजारात २० ते ६० रुपये किलोचा दर आहे. दिवाळीनंतर नवीन माल बाजारात आल्यानंतर दर कमी होतील. - अशोक आहुजा, कांदा, व्यापारी