आंबा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनेही प्रयत्न सुरू केले आहेत. मार्केटमध्ये ४१ निर्यातदार आहेत. निर्यातीसाठी २४ तास मार्केट खुले केले आहे. व्यापारासाठी अत्यावश्यक सुविधाही पुरविण्यात येत आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आंबा विक्रीची देशातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. कोकणच्या हापूससह गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश व केरळवरून आंबा येथे विक्रीसाठी येत असतो. प्रत्येक वर्षी ३०० ते ५०० कोटी रुपयांची उलाढाल आंबा हंगामामध्ये होत असते.
येथून मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यात होते. मार्केटमध्ये येणाऱ्या आंब्यामधील निर्यातक्षम आंब्याची निवड, पॅकिंग व इतर प्रक्रिया पूर्ण करताना कोणताही अडथळा येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. दरम्यान, बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे.
बुधवारी ३४ हजार ५५७ पेट्यांची आवक झाली असून, यामध्ये २६,२२० पेट्या कोकण व ८,३३७ पेट्यांची आवक इतर राज्यांमधून झाली आहे. पुढील आठवड्यात आवक अजून वाढण्याचा अंदाज आहे.
सध्या १० हजार पेट्यांची निर्यात
आंबा घेऊन येणारी वाहने विनाअडथळा मार्केटमध्ये येण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. गेट क्रमांक ३ मधून फक्त आंबा घेऊन येणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जात आहे. मार्केटमध्ये स्वच्छतेपासून इतर सुविधांवरही लक्ष दिले जात आहे. मार्केटमधून सद्यःस्थितीमध्ये ८ ते १० हजार पेठ्यांची नियमित निर्यात सुरू आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंबा हंगाम सुरू झाला आहे. व्यवसायामध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. निर्यातीसाठी २४ तास मार्केटमध्ये खुले ठेवले आहे. - संगीता अढांगळे, उपसचिव, फळमार्केट