Lokmat Agro >बाजारहाट > आनंदाची बातमी; शेतकऱ्यांना पुन्हा हसवणार कांदा, हळूहळू भावात वाढ

आनंदाची बातमी; शेतकऱ्यांना पुन्हा हसवणार कांदा, हळूहळू भावात वाढ

good news; Onion prices are gradually increasing, but be careful while selling | आनंदाची बातमी; शेतकऱ्यांना पुन्हा हसवणार कांदा, हळूहळू भावात वाढ

आनंदाची बातमी; शेतकऱ्यांना पुन्हा हसवणार कांदा, हळूहळू भावात वाढ

शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांदा आता आनंदाचे अश्रू आणण्यास सज्ज झालेला आहे. कांद्याचे बाजारभाव पुन्हा पूर्वपदावर येत असून दरही हळूहळू वाढत आहेत.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांदा आता आनंदाचे अश्रू आणण्यास सज्ज झालेला आहे. कांद्याचे बाजारभाव पुन्हा पूर्वपदावर येत असून दरही हळूहळू वाढत आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्या कांद्याचे दर वधारत असतानाच केंद्र सरकारने निर्यातशुल्क लावण्याचा निर्णय घेतला, परिणामी कांद्याचे दर काही प्रमाणात खाली आले. मात्र या आठवड्यात पुन्हा एकदा कांदा दरात हळूहळू सुधारणा होत असून चांगला पाऊस झाला नाही, तर ते आणखी वाढण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. मात्र शेतकऱ्यांनी आवश्यकता नसल्यास एकदम बाजारसमित्यांतकांदा विक्रीला न आणता हळूहळ आणावा म्हणजे त्यांना चांगले दर मिळतील असे आवाहन बाजारसाखळीतील विश्लेषकांनी केले आहे.

आज असे मिळाले दर 
आज दिनांक १ सप्टेंबर रोजी लासलगावची उपबाजारसमिती असलेल्या विंचूर बाजारसमितीत गोल्टी कांद्याला कमीत कमी २ हजार, जास्तीत जास्त २५११ आणि सरासरी २३०० रुपये दर मिळाला. आज या ठिकाणी सकाळच्या पहिल्या सत्रात ५७८ नग कांदा आवक झाली. उन्हाळ कांद्याला कमीत कमी हजार रुपये, जास्तीत जास्त २४८०, तर सरासरी २२५० असे प्रति क्विंटलला दर होते.

काल ३१ ऑगस्ट रोजी लासलगाव व विंचूर बाजारसमितीत कांद्याला सरासरी २३०० रुपये तर जास्तीत जास्त २५०० रुपये असा दर होता. पिंपळगाव बाजारसमितीत सरासरी २३०० रुपये तर जास्तीत जास्त ३००० हजार दर होता. काल विंचूर बाजारसमितीत १६ हजार ५००,  लासलगावमध्ये १४९७८ क्विंटल इतकी आवक झाली होती. याशिवाय निफाडला ४६५ नग, पिंपळगावला १०६० नग, सायखेड्याला ३०१ नग आवक झाली होती. 

सरकारी निर्णयाआधी असे होते दर
निर्यात शुल्क लागू करण्याआधी साधारणत: ११ ते १२ ऑगस्टपासून लासलगाव, पिंपळगाव बाजारसमितीत कांद्याचे दर वधारण्यास सुरूवात झाली होती. या बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे सरासरी दर २३०० रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर २५०० रुपये प्रति क्विंटल असे पोहोचले होते. मात्र त्यानंतर आठच दिवसात कांद्यावर निर्यात शुल्क लागू केले आणि शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागले.

त्यावर तोडगा म्हणून नाफेडच्या खरेदी केंद्रांमार्फत २४१० रुपये प्रति क्विंटलने कांदा खरेदी करण्याची घोषणा केंद्र सरकारने केली, मात्र शेतकऱ्यांसह त्यांच्या संघटनांनी त्याला विरोध करून हे भाव पाडण्याचे कारस्थान ठरवले. परिणामी सद्य:स्थितीत नाफेडची खरेदी केंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडली असून शेतकरी पुन्हा पारंपरिक बाजारसमित्यांकडे वळत असल्याचे चित्र बाजारसमित्यांमधील टिकून राहिलेल्या दैनंदिन आवकेवरून जाणवत आहे.

भाव वधारण्याची ही आहेत कारणे :
१. निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावण्याच्या निर्णयानंतर अनेक शेतकरी आपल्या साठवलेल्या कांद्याची सावधतेने विक्री करत आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांनी अभूतपूर्व एकजूट दाखविली असून एकदम कांदा बाजारात आणायचा नाही असे धोरणी शेतकऱ्यांनी ठरविल्याने कांद्यांची आवक नियंत्रणात आहे.
२. लवकरच श्रावण महिना संपणार असून कांद्याची मागणी आणखी काही टक्क्यांनी वाढणार आहे.
३. यंदा पाऊस लांबल्यामुळे कांद्याची लागवड उशिरा झालेली आहे. 
४. ऑगस्ट महिन्यात यंदा पावसाने सगळ्याच राज्यात ओढ दिली. कांदा उत्पादनाचे माहेरघर असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील निफाड, चांदवड, देवळा, सटाणा, येवला, सिन्नर, मालेगांव अशा तालुक्यांना यंदा कमी पावसाचा सामना करावा लागलाय. त्याचा परिणाम खरीप कांद्याच्या उत्पादनावर होणार आहे.
५. कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नगर, पुणे, धुळे, नंदुरबारच्या कांदा पट्ट्यातही पावसाने ओढ दिल्याने कांदा उत्पादनात होईल असा अंदाज उत्पादक लावत आहेत. 
६. ज्या शेतकऱ्यांचा कांदा व्यवस्थित टिकून राहिला आहे, असा साठवणुक केलेला किमान ३० टक्के कांदा अजूनही बाजारात आलेला नसल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. चांगल्या बाजारभावाच्या प्रतिक्षेत असल्याने शेतकरी तो लवकर विकण्याची शक्यता नाही.
७. नाफेडची खरेदी सुरू असली, तरी त्याला फारसा प्रतिसाद नाही. शिवाय नाफेडला आता २४१० रुपयांच्या सरकारी जाहीर केलेल्या दराने कांदा विकला आणि भविष्यात त्याचे दर वाढले, तर आपले नुकसान होईल या भीतीने शेतकरी कांदा विक्री करत नाहीत.

कांद्यावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
पावसाच ओढ आणि अचानक पडलेल्या उन्हामुळे लेट खरीप कांदा पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. कांदा पातीतला रस या किडी शोषून घेत असल्याने त्याचा परिणाम थेट कांदा उत्पादन घटण्यावर होऊ शकतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी करणे आणि कीड व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
डॉ. हेमराज राजपूत, फलोत्पादनतज्ज्ञ, के.व्ही.के, नाशिक

पावसाने ताण दिल्यामुळे लेट खरीप कांद्याचे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कांद्याचे दर आता येणाऱ्या काळात हळूहळू वाढत राहण्याची शक्यता आहे. मात्र या महिन्यात चांगला पाऊस होऊन नोव्हेंबरमध्ये चांगले उत्पादन निघाल्यास कांद्याचे भाव पुन्हा स्थिरावतील.
-मनोज जैन, कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, लासलगाव
 

Web Title: good news; Onion prices are gradually increasing, but be careful while selling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.