Join us

आवक कमी झाल्याने लसणाला चांगला भाव, आठवडी बाजारात प्रतिकिलो २८० रु

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 10:45 AM

संक्रांतीनंतर भाजीपाल्याचा दर पुन्हा गडगडला, काय आहे स्थिती?

लसणाची आवक सध्या कमी झाल्याने मंठा येथील आठवडी बाजारात लसणाला चांगला भाव मिळाल्याचे चित्र होते.  २८० ते ३०० रुपये प्रतिकिलो दराने लसणाची विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, संक्रांतीनंतर इतर भाजीपाल्याचा दर घसरला आहे.

यंदा सुरुवातीपासून खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाळून गेली, तसेच जलसाठेही आटले, विहिरींनी तळ गाठला. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक कमी प्रमाणात होत होती; परंतु आता नवीन कांदा बाजारात आल्याने कांद्याचे दर घटले आहेत. मात्र, गेल्या वर्षी लसणाचे उत्पादन कमी झाले, तसेच अद्याप नवीन लसूण निघाला नाही, त्यामुळे लसणाची आवक कमी झाली. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी आता वरणाची फोडणी महाग होणार आहे.यंदा कमी पाऊस पडल्याने शेतातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, मका, बाजरी, तूर पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यातच जमिनीत ओलावा नसल्याने बहुतेक ठिकाणी रब्बीची पेरणी झाली नव्हती. त्यामुळे रब्बीचा पेरा ५० टक्के घटला होता. मात्र, नोव्हेंबरमध्ये पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान झाले.

संक्रातीमुळे भाजीपाल्याला मिळाला भावयंदा कांदा, लसूण, अद्रक, मिरचीसह इतर पिकांची लागवड कमी झाली होती. त्यामुळे बाजारात या मालाचे भाव गगनाला भिडले आहेत. आता नवीन कांदा बाजारात दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांना १५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री करावी लागत आहे. दरम्यान, शुक्रवारी संक्रांतीचा बाजार झाल्याने वाणाच्या सामानाची भाववाढ झाली. यात वालाची ४० रुपये किलोप्रमाणे विकणारी शेंग तब्बल २०० रुपये विकली गेली. महिलांना वाणासाठी लागणाऱ्या बिब्याची २००, तर बोर २० ते ४० रुपये किलोने घ्यावे लागले.

यंदा भाजीपाल्याचे उत्पादन होणार नाही

यंदा तालुक्यातील पाझर तलाव भरलेच नाहीत, विहिरींनीदेखील तळ गाठले. त्यामुळे जास्त दिवस भाजीपाल्याचे उत्पादन होणार नाही. यंदा उत्पन्नात मोठी घट होऊन मोठ्या प्रमाणात भाववाढ होईल.- महादेव उकंडे, भाजीपाला उत्पादकभावात घसरण होणार नाही

बाजारात नवीन लसूण येण्यासाठी आणखी एक ते दोन महिन्यांचा अवधी लागणार आहे. तोपर्यंत या भावात घसरण होणार नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपूर्वी अद्रक आणि कांद्याच्या भावात मोठी वाढ झाली होती; परंतु नवीन उत्पादन बाजारात येताच भाव कमी झाले आहेत - अल्लाबकस, भाजीपाला व्यापारी 

सध्याचे बाजारातील भाज्यांचे प्रतिकिलोचे दर

लसूण २८०-३०० रुपये

कांदा १५-२० रुपये

मिरची ३०  - ४० रुपये 

अद्रक १००-१२० रुपये

टोमॅटो २० रुपये

बटाटा २० रुपये 

सिमला मिरची ३० - ४० रुपये

फुलकोबी ६०-८० रुपये

पत्ताकोबी ३०-४० रुपये

मेथी १० - १५ रुपये जुडी

पालक ५ रुपये जुडी 

शेपू १० रुपये जुडी

गाजर २०-३० रुपये

काकडी २०-३० रुपये

टॅग्स :बाजारमार्केट यार्डभाज्या