हिंगोली येथील बाजार समितीचा मोंढा आणि हळद मार्केट यार्डातील शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार २६ व २८ फेब्रुवारी रोजी बंद राहिल्याने २९ फेब्रुवारी रोजी हरभरा, हळदीसह सोयाबीनची आवक वाढली होती. भाव मात्र पडतेच असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे.
यंदा नैसर्गिक संकटांमुळे शेतमालाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. अशा परिस्थितीत भाव समाधानकारक मिळेल, अशी आशा होती; मात्र सोयाबीनचे दर कायम पडते असल्याने लागवड खर्च ही वसूल झाला नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. भाव वाढतील, या आशेमुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीविना ठेवले. मात्र, भाव वाढण्याऐवजी घसरले.
तुरीचीही अशीच परिस्थिती असून, अत्यल्प पाऊस आणि किडीचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादन निम्म्याखाली आले. अशा परिस्थितीत तुरीला किमान १२ हजारांवर भाव मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र जानेवारीत ११ हजारांचा पल्ला गाठलेल्या तुरीचे दर क्विंटलमागे जवळपास एक हजार रुपयांनी घसरले. सध्या मोंढ्यात जास्तीत जास्त दहा हजार रुपये क्विंटलने तुरीची विक्री होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा होत आहे. यंदा कापसालाही समाधानकारक भाव मिळाला नाही. जास्तीत जास्त ६ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. १२ फेब्रुवारी रोजी 'सीसीआय'चे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले, या केंद्रावर ६ हजार ९२० रुपये भाव मिळत असल्याने खासगी कापूस खरेदी केंद्रचालकांनी भाव वाढविले; परंतु सात हजारांवर कापसाचे भाव गेले नाहीत.
नवा गहू बाजारात
■ शेतकऱ्यांकडे नवा गहू उपलब्ध झाला असून, मोंढ्यात विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे आवक वाढली असून, २९ फेब्रुवारी रोजी १९० क्विंटल गव्हाची आवक झाली होती.
■ १ हजार ६०० ते २ हजार ५०० रुपयांप्रमाणे गव्हाची विक्री झाली, नवा गहू बाजारात येताच भावात घसरण झाली आहे.
■ परंतु यंदा गव्हाचे पेरणी क्षेत्र कमी असल्यामुळे उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे गव्हाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
गुरुवार (दि.२९) मोंढ्यात विक्रीसाठी आलेला शेतमाल व मिळालेला दर
आवक (क्विंटल) | शेतमाल | सरासरी भाव |
१९० | गहू | २०५० |
५० | ज्वारी | २५०० |
५०० | तूर | ९६७७ |
११०० | सोयाबीन | ४२९० |
८०० | हरभरा | ५३५७ |
१००० | हळद | १३९५० |