नाशिक : अवकाळी पाऊस, गारपिट व सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे नाशिक जिल्ह्यातून होणारी द्राक्षांची निर्यात थांबली आहे. दरवर्षी एकट्या नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक द्राक्ष निर्यात होत असते. मात्र अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाल्याने निर्यातीला ब्रेक बसला आहे. स्टोअरेजमध्ये असलेल्या द्राक्षांना कॅगिंग जाण्याची भीती, तसेच तयार होण्याच्या मार्गावर असलेल्या द्राक्ष मालाला अवकाळीचा फटका बसल्याने निर्यातीवर परिणाम झाला आहे.
देशामध्ये द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमाक असून, नाशिकची ओळख तर द्राक्षपंढरी म्हणून आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास 63 हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड केली जाते. निर्यात सुरू होण्यास अजून दोन आठवडे लागतील, अशी माहिती द्राक्ष निर्यातदारांनी दिली. मात्र, दुसरीकडे सध्या पडत असलेल्या दाट धुक्यामुळे द्राक्षमण्यांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास पोषक वातावरण तयार होत आहे. एकूणच काय तर द्राक्ष बागायतदारांसमोर संकटाचे वादळ घोंगावत राहणार असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, राज्यातील 91 टक्के द्राक्ष निर्यात नाशिक जिल्ह्यातून होत असून, नववर्षात सुरुवातीला रशिया, तसेच यूरोप खंडात नाशिक जिल्ह्यातून 250 ते 300 मेट्रिक टन द्राक्षे रवाना होतील, अशी शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. मात्र पुढे निर्यात सुरु झाल्यानंतर पुन्हा अवकाळी पावसाने नियोजनावर बाबी फेरायला नको, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होते आहे.
काय उपाययोजना कराव्यात?
गारपीट, ढगाळ वातावरणाने द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी वेलीवरील चिरलेले, सडलेले मनी आधी काढून टाकावेत. त्यानंतर बागेत क्लोरीन डाय ऑक्साइड 50 पीपीएम या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे रेसिड्युची समस्या राहत नाही. सध्या घडांवर फवारणी न करता जमिनीवर कीटकनाशकाची फवारणी करावी. कायटोसॅन 1.5 ते 2 मिली प्रती लीटर फवारणी केल्यास मण्यांचे चिरणे कमी होईल.
द्राक्ष उत्पादकांवर बदलत्या हवामामुळे संकट
द्राक्ष बागायतदार संघटनेचे माजी विभागीय अध्यक्ष माणिकराव पाटील म्हणाले की, ढगाळ वातावरण अन् झालेल्या पावसामुळे दव पडत असून त्यामुळे फुलांतल्या बागांचे नुकसान होत आहे. त्याचा परिणाम पुढे देखील निर्यातीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या निर्यात 95 टक्के थांबली आहे. हवामान समतोल झाले तर लवकर या संकटातून द्राक्ष बागायतदार बाहेर येऊ शकती, रशिया, युरोपसाठी कंटेनर रवाना होणार होते, पण त्यालाही ब्रेक लागला आहे. तर सध्याचे विभागीय अध्यक्ष रवींद निमसे म्हणाले की, द्राक्ष उत्पादकांवर बदलत्या हवामामुळे संकट आले आहे. दाक्षांसाठी देखील एक रुपयात पीकविमा मिळावा, यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत. स्पेनमध्ये कॉप कव्हरेजची मर्यादा सरसकट बागावर आहे. आपल्याकडे मात्र 100 एकरची मर्यादा अन्यायकारक आहे. सरक्षित फळबागा धोरण शासनाने आखले तरच द्राक्ष व इतर दळबागायतदार मार्केटमध्ये टिकतील.