सोलापूर : डिसेंबर-जानेवरीपासूनच द्राक्षांच्या आवकीला सुरुवात झालेली होती; परंतु ती द्राक्षे चवीला आंबट होती. आता उष्णता वाढायला सुरुवात झाल्याने गोड द्राक्ष दाखल होत आहेत.
फळबाजारातसोलापूर जिल्ह्यासह बारामती, सांगली, अहिल्यानगर जिल्ह्यातून द्राक्षांची आवक होत आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो द्राक्षांची विक्री ६० ते ८० रुपये किलो दराने केली जात आहे.
आता उष्णता वाढत असून, सध्या द्राक्षाच्या बागेला पोषक असे उष्ण वातावरणनिर्मिती सुरू झाली आहे. या उष्णतेमुळे फळामध्ये गोड रस निर्माण होण्यास सुरवात झालेली असून, पुढील काही दिवसांत द्राक्ष आणखीन गोड मिळणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
दरवर्षी द्राक्षांचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. यंदा पाऊस लांबल्याने द्राक्षांचा हंगाम महिनाभर उशिराने सुरू झाला. एप्रिल महिन्यात हंगामाची अखेर होती.
रशियन अन् चायना द्राक्षेसध्या काळी हिरवी द्राक्षासह रशिया आणि चायना येथून लाल रंगाची द्राक्षे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. बाजारात तीनशे ते चारशे रुपये किलोने द्राक्ष विकले जात आहेत. द्राक्षांना चांगली चव असल्यामुळे लोकांची पसंती असल्याचे द्राक्ष व्यापाऱ्यांनी सांगितले.
आवक वाढली- सद्य:स्थितीत फळबाजारात रोज ४८० ते ५०० क्रेट द्राक्षांची आवक होत आहे. एका क्रेटमध्ये नऊ किलो द्राक्षे असतात.- काळी द्राक्षांची बारामती आणि सातारा जिल्ह्यातून आवक होत आहे. बाजारात विक्रीला आलेल्या द्राक्षांचा दर्जा चांगला असून गोडी अधिक आहे.- द्राक्षांना मागणी अधिक असल्याने घाऊक बाजारात चांगली मागणी आहे.- यंदा द्राक्षांचा हंगाम मे महिन्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.