जत तालुक्यात द्राक्ष बागांमधील द्राक्षाची काढणीची धांदल सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांनी बाजारात द्राक्षाचे दर पाडले आहेत. माणिक चमन द्राक्षाला २५ ते २८ रुपये किलो दर आहे. महागडी औषधे, खते, मशागतीचा खर्च पाहता परवडत नसल्याने शेतकऱ्यांचा बेदाणा तयार करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे बेदाण्याचे शेड हाऊसफुल झाले आहेत.
तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी फोंड्या माळरानावर द्राक्षबागा उभारल्या आहेत. तालुक्यात ११ हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागा आहेत. यावर्षी प्रतिकूल हवामान, भीषण दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव अशा अनेक संकटांवर मात करीत द्राक्षबागा आणल्या आहेत.
बिळूर, उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, खोजानवाडी, तिकोंडी येथील बागायतदारांनी बाजारात थेट विक्री करण्यासाठी उत्पादन घेतात. पूर्व भागातील उमदी, सिद्धनाथ, संख, बेळोंडगी, निगडी बुद्रुक, जालिहाळ खुर्द, कोंतवबोबलाद, हळ्ळी, बालगाव परिसरातील शेतकरी बेदाणा करतात.
द्राक्ष घड विरळ करण्यासाठी थिनिंग केले आहे. थिनिंगसाठी हजारो रुपये खर्च केले आहेत, घडातील मण्यांची वाढ चांगली झाली आहे. अवकाळी पाऊस, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे आगाप छाटणी घेतलेल्या बागा वाया गेल्या आहेत. पूर्व भागातील उमदी, खोजानवाडी, सोनलगी, सुसलाद, बेळोंडगी, बालगाव, हळ्ळी, अंकलगी येथील बागांना अवकाळीचा मोठा फटका बसला आहे, उत्पादनात घट झाली आहे.
यावर्षी शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असतानाच व्यापाऱ्याने दर पाडले आहे. व्यापारी फक्त चांगला दर्जेदार माल घेऊन जातात. बाकीचा माल घेत नाहीत. त्यामुळे उत्पादक द्राक्ष उत्पादक उपाशी, व्यापारी दलाल मात्र तुपाशी अशी स्थिती झाली आहे.
आता शालेय पोषण आहारात राज्य सरकारने बेदाण्याचा समावेश केल्याने बेदाण्यास निश्चितच चांगले दिवस येतील अस बागायतदारांचा समज आहे. त्यामुळे निसर्गाच्या अवकृपेने पिचलेला शेतकरी आता बागेतील उरलेला माल बेदाणा रॅकवर टाकत आहेत.
पाण्यावर होतोय सर्वात जास्त खर्च
पाण्यासाठी टँकर, शेत तलाव, कूपनलिका, विहीर खुदाई करुन लाखो रुपये खर्च केले आहेत. आजपर्यंत सर्वात जास्त पैसे पाण्यावर खर्च झाले आहेत.
बेदाण्यास चांगला दर
आधुनिक तंत्रज्ञानाची, उत्तम कौशल्याची जोड, कोरड्या हवामान तालुक्यात बागायतदारांनी दर्जेदार बेदाण्याची निर्मिती केली आहे. सध्या बेदाणाला प्रतिकिलो दर १३० ते १५० रुपये दर आहे.
तालुक्यात मजुरांची टंचाई: उत्पादकांत चिंता
सध्या द्राक्षांची काढणी, द्राक्ष रोडवर टाकणे, बेदाणा रोड झाडणे, पेटी पॅकिंग करणे आदी कामे मजुराकरवी केली जात आहेत. महिलांना दिवसासाठी २५० रुपये, पुरुषाला ३५० रुपये मजुरी आहे. ज्वारीची, गव्हाची मळणी सुरू आहे. सर्वत्र काढण्याची धांदल सुरू झाल्याने मजुरांची टंचाई भासत आहे.