संजयकुमार चव्हाणमांजर्डे (जि. सांगली) तासगाव तालुक्यात द्राक्ष हंगाम जोमात आहे. पण, बाजारात व्यापाऱ्यांनी भाव पाडले आहेत. द्राक्षांचे पडलेले दर व व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा बेदाणा निर्मितीकडे कल दिसून येत आहे. यंदा मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन झाल्याने बेदाणा उत्पादनातही विक्रमी वाढ होणार असल्याचे चित्र आहे.
तासगाव तालुक्यातील आरवडे, मांजर्डे, पेड, विसापूर, सावळज, मणेराजुरी परिसरात काही द्राक्ष उत्पादकांनी स्वतः शेड तयार करून बेदाणा उत्पादन सुरू केले आहे. तर, काही शेतकऱ्यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातून मजुरी देऊन बेदाणा करून घेण्याची व्यवस्था केली आहे.
वीस किलोमागे एक किलो सूट अशी शेतकऱ्याला खड्यात घालणारी पद्धत सुरू आहे. सुरुवातीला ४०० ते ४८० रुपये चार किलो प्रतिपेटी असलेला भाव सध्या १०० ते १४० रुपयांपर्यंत घसरला आहे. या दराने उत्पादन खर्चसुद्धा हाती लागणार नाही. त्यामुळे बेदाणा निर्मितीस उत्पादक पसंती देत आहेत. तासगाव व सांगली येथे बाजार समितीच्या सौद्यात बेदाण्याला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसेल, अशी भीती असणारे शेतकरी बेदाण्याकडे वळत आहेत.
बेदाण्यास किलोला ३० ते ३५ रुपये मजुरीतासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मितीसाठी रॅक तयार केले आहेत. किलोला ३० ते ३५ रुपये मजुरी आकारून बेदाणा तयार करून दिला जात आहे. कवठेमहांकाळ, जत, मिरज या भागांतही बेदाणा उत्पादन वाढणार आहे. पुढील तीन महिने बेदाणा निर्मितीसाठी पोषक वातावरण आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे तसेच उत्पादन जास्त असल्याने व बाजारात कमी मागणी असून दाक्षाचे दर घसरले आहेत. दर्जेदार द्राक्षे तयार केली तरच वाढीव दर व चांगले उत्पन्न मिळेल. - पृथ्वीराज पवार, द्राक्ष उत्पादक, मणेराजुरी (जि. सांगली)