राजुरा बाजार :
हिरवी मिरची शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणते; परंतु यंदा मात्र तीला बाजारात चांगला दर मिळतोय. एरव्ही दोन हजार ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत राहणारे भाव एकाएकी तिप्पट झाल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आजपर्यंतच्या हा उच्चांकी भाव आहे.
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी हिरव्या मिरचीचे भाव ६ हजार ५०० दुसऱ्या दिवशी ७ हजार तर सलग तिसऱ्या दिवशी ७ हजार ५०० पर्यंत गेल्याने हिरवी मिरची उत्पादक शेतकऱ्यांना नवरात्रीला दुर्गा पावली असल्याची प्रचिती मिळाली. यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सलग तीन वर्ष ऐन हंगामातच मिरचीचे भाव कोसळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण होते. पर्यायाने लागवड दिवसेंदिवस कमी होत चालली. शेतकरी अतिवृष्टी, विविध कीड, आकस्मिक मर रोग, वाढलेले कीटकनाशक-रासायनिक खतांचे दर, मजुरांची टंचाई, वाढलेला लागवड खर्चही निघत नव्हता. यंदाही मिरची झाडावर आकस्मिक मर आल्याने शेतकरी हैराण आहेत.
तथापि, दरवाढीने त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. यंदा प्रथमच बांगलादेश येथून मागणी आल्याने भाव तिपटीवर गेले आहेत. राजुरा बाजार येथील राष्ट्रसंत तुकडोजी उपबाजार समिती येथे सायंकाळी ७ ते रात्री १ पर्यंत दररोज बाजार भरतो. येथून वाशी, कोलकाता, रायपूर, लखनऊ करिता दररोज हिरव्या मिरचीचा माल पाठवला जातो.
बांगलादेश येथून नवरात्रीच्या पहिल्याच दिवसापासून मागणी आल्याने भाववाढ झाली आहे. ही वाढ किती दिवस राहील, हे सांगता येणार नसले तरी शेतकऱ्यांना मिळणारे उत्पादन समाधानकारक आहे. - मुन्ना चांडक, हिरवी मिरची व्यापारी
यंदा केलेली मिरची लागवड अतिवृष्टीच्या तावडीतून बचावली आहे. अज्ञात मर रोगासह अनेक संकटे आहेत. मिळालेले मिरचीचे दर तरीही सुखावह आहेत. - जगदीश राऊत, मिरची उत्पादक शेतकरी, चिंचरगव्हाण, ता. वरूड