Join us

Green Chilli Market मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आणले पाणी; मिरची दरात ७० टक्क्यांनी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 10:44 AM

धावडा आणि रेणुकाई पिंपळगाव येथील ठोक बाजारात मंगळवारी मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने ७० टक्क्यांनी भाव कमी झाले आहेत. बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक झाल्याने ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा आणि रेणुकाई पिंपळगाव येथील ठोक बाजारात मंगळवारी मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने ७० टक्क्यांनी भाव कमी झाले आहेत. बाजारपेठेतमिरचीची मोठी आवक झाल्याने ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बाजारपेठेत दररोज शेतीमालाचे दर घसरत आहेत. परिणामी, लागवडीचा खर्चही निघत नसल्याने मिरची उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सुरुवातीला १० ते ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर पोहोचले होते. त्यापाठोपाठ ९ ते १० हजारांपर्यंत भाव खाली आले; परंतु मंगळवारी हे भाव तर ३ ते ५ हजारांवर आल्याने शेतकऱ्यांचा फवारणी, निंदणीसह तोडणीचा खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे.

यंदा तालुक्यात मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे बाजारात सर्वाधिक हिरवी मिरची दाखल झाली आहे. एका शेतकऱ्याला एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च लागला आहे. एप्रिलपासून मिरचीचा चौथा ते पाचवा तोडा तोडणे सुरू आहे, सुरुवातीला काळी मिरचीला ११० रुपये किलो दर होता. आता ही मिरची ५० रुपये किलोने विक्री होत आहे.

सुरुवातीचे भाव चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण होते; परंतु, मंगळवारी हे भाव खूपच खाली आल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर निघत आहे. सध्या भोकरदन तालुक्यासह इतर भागांत मिरचीचे उत्पन्न कमालीचे वाढले आहे. त्यामुळे धावडा, रेणुकाई पिंपळगाव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने मिरचीचे दर घसरून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

यंदा मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव अधिक 

सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. त्यामुळे मिळेल त्या दराने शेतमाल विक्री करावा लागत आहे. विक्री न झाल्यास फेकून द्यावा लागेल. या भीतीपोटी मंगळवारी व्यापाऱ्यांनी मागितलेल्या भावात मिरची देऊन टाकली आहे. यंदा मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव अधिक झाल्याने उत्पादक शेतकरी तोट्यात आहे. - रत्नाकर तांगडे, मिरची उत्पादक शेतकरी.

भावामध्ये दररोज चढ-उतार सुरूच

या आठवड्यात उन्हाळी मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने भावामध्ये चढ- उतार होत आहे. बाजारपेठ परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे मिरचीचे भाव घसरले आहेत. गेल्या आठवड्यात मिरचीला चांगला दर मिळाला होता. - अशोक तबडे, व्यापारी, धावडा.

यंदा तोडणीसह वाहतूक खर्चही वाढला

• मिरचीचे रोप लागवडीपासून ते तोडणीपर्यंत शेतकऱ्यांना एका एकरसाठी अंदाजित ७० ते से ८० हजार रुपये खर्च येतो.

• यात तोडणीसाठी मजूर मिळत नसल्याने एक किलो मिरची तोडण्यासाठी गाडी भाड्यासहित ९ रुपये मजूरी द्यावी लागते. यंदा तोडणी आणि वाहतूक खर्च वाढल्याने शेतकरीही अडचणीत सापडले आहेत.

बाजारपेठेत ठोक मिरचीचे भाव

मिरचीचा प्रकारपूर्वीचे दरमंगळवारचे भाव
काळी मिरची१२० रुपये२५-३० रुपये
रुवेलरी (पांढरी)८० रुपये४५ रुपये
शिमला६० रुपये३० रुपये
बळीराम७० रुपये३० रुपये
पिकेडोर८० रुपये३० रुपये

हेही वाचा -  Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी

टॅग्स :बाजारमिरचीजालनाजालनाशेती क्षेत्रशेतकरीशेतीभोकरदन